धार्मिक क्षेत्रांचे पावित्र्य जपा !

नुकतेच केदारनाथ आणि बद्रीनाथ या तीर्थक्षेत्रस्‍थळी भ्रमणभाष अन् चित्रीकरण यांवर बंदी घालण्‍यात आली आहे. काही लोक तिथे भक्‍तीपूर्ण दर्शन घ्‍यायला अल्‍प आणि पर्यटनासाठीच अधिक जातात. त्‍यामुळे तिथे छायाचित्र काढणे, चित्रीकरण या गोष्‍टी अधिक प्रमाणात वाढल्‍या होत्‍या. तेथील पावित्र्य जपले जात नव्‍हते. समाजमाध्‍यमांवरूनही याविषयी टीका करण्‍यात येत होती. केवळ केदारनाथ आणि बद्रीनाथ येथेच नव्‍हे, तर सर्वच तीर्थक्षेत्री अन् मंदिरांत छायाचित्र आणि चित्रीकरण यांवर निर्बंध घालायला हवेत. मंदिर हे चैतन्‍याचे स्रोत आहेत. तिथे गेल्‍यावर भाविकांना आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ कसा होईल ? यासाठी मंदिर प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. भाविक प्रतिदिनच्‍या धावपळीतून मानसिक शांतता लाभावी, तसेच त्‍याच्‍या इच्‍छित कार्यामध्‍ये येणारे अडथळे दूर व्‍हावेत, स्‍वतःचे सुख-दुःख देवाजवळ सांगावे, या हेतूने देवदर्शनाला जातो. असे असतांना तो मंदिरात गेल्‍यावर अतीउत्‍साही मंडळी इतरांचा काही विचार न करता छायाचित्र/चलचित्र काढण्‍यात व्‍यस्‍त असतात. असे केल्‍याने त्‍यांची वृत्ती बर्हिमुख तर होतेच; पण जे श्रद्धेने मंदिरात येतात, त्‍यांच्‍याही देवदर्शनात व्‍यत्‍यय येतो. म्‍हणून अशा हौशा-गौशांवर कडक निर्बंध घालायलाच हवेत.

मंदिरात गेल्‍यावर ‘देवतेचे दर्शन कसे घ्‍यावे ?’, ‘कळसाला प्रथम नमस्‍कार का करावा ?’, ‘प्रदक्षिणा कशी घालावी ?’, ‘नमस्‍कार कसा करावा ?’ हे सर्व धर्मशिक्षण हिंदूंना देण्‍यासाठी मंदिर प्रशासनाने पुढाकार घेऊन आठवड्यातून किंवा मासातून एकदा धर्मशिक्षणवर्ग आयोजित करायला हवेत. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्‍याने ‘मंदिरात गेल्‍यावर काय करावे ?’, हेच त्‍यांना ठाऊक नसते. त्‍यामुळे ते पर्यटनाला गेल्‍याप्रमाणे मंदिरात जातात आणि ‘तेथील पावित्र्य कसे जपले जाईल ?’, याकडे गांभीर्याने पहात नाहीत. अन्‍य धर्मीय त्‍यांच्‍या प्रार्थनास्‍थळांवर गेल्‍यावर ज्‍याप्रमाणे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करतात किंवा त्‍याचे पालन करतांना त्‍यांना कुठलाच संकोच वाटत नाही, त्‍या पद्धतीने हिंदू करतांना दिसत नाहीत; कारण हिंदूंना त्‍याचे धर्मशिक्षण नाही. धर्मशिक्षणाच्‍या अभावामुळे हे सर्व होत आहे. धर्मशिक्षण दिल्‍याने मंदिरांचे महत्त्व लक्षात येऊन पावित्र्य जपण्‍याचा प्रयत्न वाढेल. मंदिरात भ्रमणभाष बंदीमुळे मंदिरांना द्याव्‍या लागणार्‍या ‘तिजोरीच्‍या (लॉकर) सुविधे’साठी अन्‍य व्‍यावसायिक लाभ उठवतात. मंदिर प्रशासनाने अत्‍यल्‍प दरात ही सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍यास याचे बाजारीकरण होणार नाही.

– श्री. जयेश बोरसे, पुणे