परात्‍पर गुरु डॉक्‍टरांप्रती ओढ निर्माण झाल्‍यावर गुरुदेवांनी विविध प्रसंगांतून ‘ईश्‍वराशी जोडणे कसे महत्त्वाचे आहे’, याची पू. शिवाजी वटकर यांना दिलेली शिकवण !

सेवेची ओढ वाढणे; म्‍हणजे गुरुप्राप्‍तीची ओढ वाढणे ! – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर भेटल्‍यामुळे पू. शिवाजी वटकर यांच्‍या जीवनात आनंद कसा निर्माण झाला ?’, याविषयी आपण १५.७.२०२० या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या भागात पाहिले. आजच्‍या भागात ‘पू. वटकर यांच्‍या मनात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती निर्माण झालेले दैवी आकर्षण आणि अपार भाव’, यांविषयीची सूत्रे बघणार आहोत.      

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/701518.html
पू. शिवाजी वटकर

७. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयी जाणवणारे दैवी आकर्षण

७ अ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांंचे मुंबई येथील निवासस्‍थान साधनेचे प्रेरणास्‍थान बनणे : ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांंचे मुंबई येथे निवासस्‍थान होते आणि तेच सनातन संस्‍थेचे सेवाकेंद्रही होते. वर्ष १९९० पासून वर्ष २००६ पर्यंत म्‍हणजे मी तिथे साधना आणि सेवा करण्‍यासाठी जात असे. वर्ष १९९० ते १९९९ पर्यंत, म्‍हणजे ९ – १० वर्षे मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या थेट मार्गदर्शनानुसार आणि कृपाछत्राखाली साधना करण्‍याचे भाग्‍य लाभलेे. माझ्‍यासाठी त्‍यांचे निवासस्‍थान हेच सनातन संस्‍थेचे मुख्‍य कार्यालय आणि साधनेचे प्रेरणास्‍थान होते.

७ आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे निवासस्‍थान स्‍मशानाजवळ आणि रज-तमाच्‍या वातावरणात असूनही ‘तिथे जावे’, असे वाटणे अन् तेथे गेल्‍यावर शांत वाटणे : ‘मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या निवासस्‍थानी नेहमी का जातो ? आणि मला तेथे का थांबावेसे वाटते ?’, याचे मला आश्‍चर्य वाटायचे. प्रत्‍यक्षात त्‍यांचे निवासस्‍थान असलेली इमारत स्‍मशानाच्‍या फाटकाला (कंपाउंडला) लागून होती. त्‍यामुळे तिथे प्रेते जळण्‍याचा वास आणि धूरही येत असे. त्‍यांच्‍या इमारतीजवळ रज-तमाचे वातावरण होते. असे असतांनाही मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडे जायचो. तिथे गेल्‍याविना मला करमायचे नाही.

यावर देवाने मला पुढील दृष्‍टीकोन देऊन तिकडे जाण्‍यासाठी स्‍फूर्ती दिली, ‘लोक साधना करण्‍यासाठी हिमालयात जाऊन प्रतिकूल वातावरणात तपश्‍चर्या करतात. मला त्‍यापेक्षा सुलभ ठिकाणी जायला मिळत आहे. हिमालयात किंवा इतरत्र मला जो आनंद आणि सुविधा मिळणार नाहीत, त्‍या सर्व सुविधा मला इथे मिळत आहेत.’ मुंबई येथेे गेल्‍यानंतर माझ्‍या मनातील नकारात्‍मक विचारांचे त्‍वरित सकारात्‍मक विचारांत परिवर्तन होत असे. माझ्‍या मनाची अस्‍वस्‍थता अन् अस्‍थिरता जाऊन मला शांत वाटायचे. त्‍यामुळे कोणतेही अडथळे आले, तरी काहीही करून मी त्‍यांच्‍याकडे जात असे.

८. नामजपामुळे साधनेतील अडथळे दूर होणे आणि ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी सांगितलेले सर्व नामजप गुरुमंत्रच आहेत’, असे अनुभवणे

मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडे पहिल्‍यांदा गेलो. तेव्‍हा त्‍यांनी मला कुलदेवतेचा नामजप करायला सांगितला. नंतर त्‍यांच्‍या सांगण्‍यानुसार कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप केल्‍यावर मला अनेक अनुभूती आल्‍या. माझ्‍या साधनेतील अडथळे दूर होऊन मला सत्‍संगाची गोडी लागली. परात्‍पर गुरु डॉक्‍टर आम्‍हाला म्‍हणाले होतेे, ‘‘नामस्‍मरण’ हा प.पू. भक्‍तराज महाराज यांचा प्राण आहे. त्‍यांनी भजनांमध्‍ये नामस्‍मरणाचे महत्त्व सांगितले आहे.’’

नामस्‍मरण केल्‍यामुळे माझे शारीरिक, मानसिक आणि आध्‍यात्मिक त्रास उणावले. तेव्‍हापासून आतापर्यंत ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला जे नामजप किंवा आध्‍यात्मिक उपायांसाठी मंत्रजप सांगितले आहेत, ते सर्व गुरुमंत्रच असतात’, असे मी अनुभवले आहे. ‘माझ्‍या कुलदेवतेने मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांमधील गुरुतत्त्वाकडे सर्वस्‍वी सोपवले आहे’, असे मला वाटते.

९. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘अव्‍यक्‍त भाव असेल, तर समष्‍टी सेवा चांगल्‍या प्रकारे करता येते’, असे सांगणे

परात्‍पर गुरु डॉक्‍टर घेत असलेल्‍या अभ्‍यासवर्गाच्‍या वेळी बर्‍याच साधकांचा भाव जागृत होऊन त्‍यांच्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू येत. माझी मात्र क्‍वचितच भावजागृती होत असे. त्‍यामुळे ‘मी रुक्ष आहे. माझ्‍यात भाव नाही’, असे मला वाटत असे. याविषयी मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना विचारल्‍यावर ते मला म्‍हणाले, ‘‘व्‍यक्‍त (व्‍यष्‍टी) आणि अव्‍यक्‍त (समष्‍टी)’, असे भावाचे २ प्रकार असतात. व्‍यक्‍त भाव असला, तर त्‍या स्‍थितीत समष्‍टी सेवा करता येत नाही आणि अव्‍यक्‍त भाव असेल, तर समष्‍टी सेवा चांगल्‍या प्रकारे करता येते.’’ हे ऐकल्‍यानंतर मी त्‍यांचे आज्ञापालन करून समष्‍टी सेवा करत राहिलो.

१०. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांंनी ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ’ हे तत्त्व कृतीतून शिकवून ‘स्‍वतःला ईश्‍वराशी जोडणे महत्त्वाचे आहे’, अशी महान शिकवण देणे

१० अ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी ‘स्‍थूल देहाच्‍या सेवेपेक्षा गुरुपौर्णिमेची सेवा अधिक महत्त्वाची आहे’, हे प्रसंगातून शिकवणे : वर्ष १९९६ मध्‍ये मानखुर्द, मुंबई येथे आमच्‍या घराजवळील शाळेमध्‍ये परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची सभा होती. सभेनंतर आमच्‍या घरी ‘भेट आणि भोजन’, असेे त्‍यांचे नियोजन केले होते. त्‍यामुळे मला फार आनंद झाला होता; मात्र वर्ष १९९६ च्‍या गुरुपौर्णिमेच्‍या नियोजनाची बैठक नेमकी त्‍याच दिवशी सांगली येथे होती. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला तिकडे जाण्‍यास सांगितले. ते म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही घरी नसलात, तरी चालेल. मी तुमच्‍या घरी जाईन.’’ त्‍याप्रमाणे मी घरी नसतांनाही ते आमच्‍या घरी जाऊन आले. ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ’ म्‍हणजे प.पू. डॉक्‍टरांच्‍या स्‍थुलातील सेवेपेक्षा ‘गुरुपौर्णिमेची सेवा (समष्‍टी सेवा) श्रेष्‍ठ आहे’, हे त्‍यांनी मला या प्रसंगातून शिकवले.

१० आ. ‘स्‍थूल देहा असे ।’ या पंक्‍तीतून तत्त्वनिष्‍ठ रहाण्‍याची शिकवण देणे : मला प.पू. डॉक्‍टरांच्‍या स्‍थुलातील सत्‍संगाची सवय झाली होती. नंतर ते आधी देवद आणि नंतर गोवा येथील आश्रमांत रहायला गेल्‍यावर त्‍यांनीच त्‍यांचा हा स्‍थुलातील वियोग सुसह्य करून देऊन त्‍यांच्‍या पुढील पंक्‍तींची मला अनुभूती दिली.

‘स्‍थूल देहा असे । स्‍थळकाळाची मर्यादा ।
कैसे असू सर्वदा । सर्वा ठायी ॥
सनातन भारतीय संस्‍कृति । माझे नित्‍य रूप ।
त्‍या रूपे मी सर्वत्र । आहे सदा ॥’  

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला त्‍यांच्‍यात किंवा इतर व्‍यक्‍तींमध्‍ये अडकू दिले नाही. त्‍यांनी मला सनातन संस्‍थेशी, म्‍हणजे त्‍यांच्‍या समष्‍टी रूपाशी जोडून दिले. ‘सनातन संस्‍था’ हे ईश्‍वरप्राप्‍ती करण्‍यासाठी असलेले एक माध्‍यम आहे. या माध्‍यमलाही उत्‍पत्ती, स्‍थिती अन् लय आहेे; म्‍हणून ‘तत्त्वाशी, म्‍हणजे ईश्‍वराशी जोडणे महत्त्वाचे आहे’, असे सांगून त्‍यांनी मला स्‍वयंपूर्ण होऊन तत्त्वनिष्‍ठ (ईश्‍वरनिष्‍ठ) रहायला शिकवलेे. वरील सुवचनानुसार त्‍यांनी ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ’ हे मला त्‍यांच्‍या आदर्श कृतीतून शिकवले.

आतापर्यंतच्‍या माझ्‍या जीवनातील घटनांवरून ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर हे परब्रह्म आहेत’, हे त्‍यांच्‍याच कृपेने माझ्‍या लक्षात येत आहे. याची मला एकट्यालाच नाही, तर सनातनच्‍या सहस्रो साधकांना अनुभूतीही येत आहे. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला त्‍यांच्‍या चरणांचा धूलीकण म्‍हणून रहाण्‍याचे भाग्‍य दिले आहे’, यासाठी मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटते.’

(क्रमशः)

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.५.२०२०)

भाग ४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/702473.html

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक