‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत ‘वास्तूंमधील सात्त्विकतेचा अभ्यास’ या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी व्हा !

‘सध्या समाजात वास्तूशास्त्र पुष्कळ प्रचलित आहे. प्रत्येकाला वाटते की, आपले घर वास्तूशास्त्रानुसार असावे. घरात वास्तूदोष असल्यास त्याचे तेथे निवास करणार्‍यांवर विपरीत परिणाम होतात. वास्तूदोष दूर करण्याच्या विविध उपायपद्धती समाजात प्रचलित आहेत. येथे लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे वास्तूशास्त्रानुसार घर बांधण्यास पुष्कळ मर्यादा येतात. तसेच वास्तूदोष दूर करण्यासाठी कितीही पैसे व्यय करून उपाय केले, तरी त्याचा परिणाम कायम टिकून रहात नाही. यावर प्रभावी उपाय म्हणजे प्रत्येकाने नियमित साधना करून स्वत:तील सात्त्विकता वाढवावी, जेणेकरून त्याचा सकारात्मक परिणाम सतत वास्तूवर होत राहील आणि तो दीर्घकाळ टिकूनही राहील. याचे अतिशय सुंदर अन् बोलके उदाहरण म्हणजे संतांचे निवासस्थान होय. येथे गेल्यावर सर्वांना चांगल्या अनुभूती येतात. याचे कारण हे की, संतांमधील चैतन्यामुळे त्यांचे निवासस्थान सात्त्विक बनते. अशा सात्त्विक वास्तूमध्ये चैतन्य असल्याने तेथे वावरणार्‍याला त्याचा लाभ होतो.

१. वास्तूंचे प्रकार

१ अ. गृहवास्तू : यामध्ये कौलारू घरे, जुने वाडे, सदनिका (फ्लॅट), बंगला इत्यादी विविध प्रकारची निवासस्थाने येतात. यामध्ये सर्वसाधारण व्यक्ती, त्रास असणारे, त्रास नसणारे, ६० टक्के किंवा अिधक पातळीचे साधक, दैवी बालके (उच्च स्वर्गलोक, महर्लाेक), बालसंत, संत (गुरु, सद्गुरु, परात्पर गुरु) यांच्या निवासस्थानांचा अभ्यास करू शकतो.

१ आ. व्यावसायिक वास्तू : यामध्ये दुकान, आस्थापन, कारखाना, रुग्णालय इत्यादी विविध प्रकारच्या व्यावसायिक वास्तू येतात. यामध्ये सर्वसाधारण व्यक्तीच्या आणि साधकांच्या व्यावसायिक वास्तू यांचा अभ्यास करू शकतो. यातून व्यवसाय करणार्‍या व्यक्तीने साधना केली, तर त्याच्यातील सात्त्विकतेचा सुपरिणाम त्याच्या व्यावसायिक वास्तूवर होऊन तीही चैतन्यमय होऊ शकते, हे समाजाला सांगून त्यांना साधनेस प्रवृत्त करता येईल.

१ इ. आध्यात्मिक वास्तू : यामध्ये पुढील प्रकार येतात. यातून आध्यात्मिक वास्तूंचे महत्त्व सर्वांना लक्षात येईल. तसेच तेथील चैतन्य टिकवणे किती आवश्यक आहे ? आणि यासाठी काय प्रयत्न करू शकतो ? हेही समाजाला सांगता येईल.

१ इ १. देवतांची मंदिरे : श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान, गणपति, दत्त, शिव, श्री दुर्गादेवी आदी उच्च देवता, कुलदेवता आणि ग्रामदेवता यांची मंदिरे.

१ इ २. तीर्थक्षेत्रे : ज्योतिर्लिंगे, शक्तीपिठे, चारधाम इत्यादी.

१ इ ३. संतांशी संबंधित : संतांचे मठ / आश्रम / निवासस्थान / उपासना-स्थान (तपोस्थान)/ समाधीस्थळ

१ इ ४. आध्यात्मिक संस्था : संस्थेचे कार्यालय, त्यांचे आश्रम इत्यादी.

२. वास्तूंचे संशोधन

सौ. मधुरा कर्वे

वास्तूंचे संशोधन पुढे दिलेल्या माध्यमांतून करू शकतो.

२ अ. वास्तूचा वास्तूशास्त्रदृष्ट्या अभ्यास

१. वास्तू वास्तूशास्त्रातील नियमांनुसार आहे का ? असल्यास किती टक्के आहे ?

२. वास्तूतील देवघराची जागा आणि देवघरातील देवतांची मांडणी यांचा अभ्यास

३. वास्तूची शुद्धी केली जाते का ? कशा प्रकारे आणि किती वेळा केली जाते ?

२ आ. साधनेमुळे वास्तूवर होणारा परिणाम : निवासी वास्तूंच्या संदर्भात पुढील माहिती गोळा करता येईल.

१. घरातील सदस्य कुलाचारांचे पालन करतात का ?

२. घरातील सदस्य उपासना (साधना) करतात का आणि कोणती करतात ? उपासना नियमित कि प्रासंगिक करतात ?

३. घरात निवास करणार्‍यांना पूर्वजांचे किंवा वाईट शक्तींचे त्रास आहेत का ? असल्यास त्यांची तीव्रता किती आहे ? त्रासाचे स्वरूप कसे आहे ?

४. घरात सत्संग होतो का ? किंवा संतांचे येणे असते का ? किंवा त्यांचे स्थान, गादी असे काही आहे का ?

५. साधना करणार्‍यांना त्यांच्या घरात काही वैशिष्ट्यपूर्ण पालट जाणवतात का ? हे पालट कधीपासून जाणवू लागले ?

२ इ. सूक्ष्म परीक्षण : वास्तूत गेल्यावर ‘मनाला कसे जाणवते ?’, याचा अभ्यास करणे.

२ ई. लोलक परीक्षण : वास्तूतील सकारात्मक अन् नकारात्मक स्पंदने अभ्यासणे.

२ उ. वैज्ञानिक उपकरणाद्वारे संशोधन

१. ‘यूनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे वास्तू आणि तेथील माती (धूळ इत्यादी), पाणी अन् वायूमंडल यांतील सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने अभ्यासणे.

२. ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी (पी.आय.पी.)’ तंत्रज्ञानाद्वारे वास्तूतील सात्त्विकता अभ्यासणे.

३. ‘रीझोनेन्स् फिल्ड इमेजिंग (आर्.एफ्.आय.)’ उपकरणाद्वारे वास्तूच्या ऊर्जाक्षेत्राची स्थिती अभ्यासणे.

वरील व्यतिरिक्त अन्य काही वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करणे शक्य असल्यास त्याची विस्तृत माहिती ‘इ-मेल’द्वारे कळवावी.

श्रीगुरुचरणी कृतज्ञता !

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा आणि श्री. धनंजय कर्वे, फोंडा, गोवा. (२८.६.२०२३)

इ-मेल – [email protected]


‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत ‘वास्तूंमधील सात्त्विकतेचा अभ्यास’ या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !

साधकांना सूचना आणि वास्तूतज्ञ, वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

या संशोधन कार्यात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार स्वतःची माहिती [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा टपाल पत्त्यावर पाठवावी. इ-मेल पाठवतांना त्याच्या विषयामध्ये ‘वास्तूचा सात्त्विकतेच्या दृष्टीकोनातून अभ्यास’ असा कृपया उल्लेख करावा.

टपालासाठी पत्ता : श्री. आशिष सावंत, द्वारा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’, भगवतीकृपा अपार्टमेंट्स, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा ४०३४०१

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.