पुणे – पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे तत्कालीन सदस्य तसेच उपायुक्त नितीन ढगे आणि त्यांची पत्नी प्रतिभा ढगे यांच्या विरोधात भ्रष्ट मार्गाने पैसे कमावल्याच्या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी ढगे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत १ कोटी २८ लाख ४९ सहस्र रुपये मिळाले होते. या संदर्भात केलेल्या अन्वेषणात त्यांनी ही मालमत्ता भ्रष्ट मार्गाने मिळवल्याचे उघड झाले होते. कागदपत्रांमध्ये खोटी माहिती भरून सरकारची फसवणूक करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने ‘एसीबी’च्या पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले यांनी ढगे यांच्या पत्नीच्या विरोधात तक्रार नोंद केली होती. ढगे दांपत्याच्या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील अन्वेषण पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर करत आहेत.
संपादकीय भूमिकाभ्रष्ट अधिकार्यांना कशाचाच धाक उरला नाही, हेच यावरुन सिद्ध होते. देशाला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक ! |