ठाणे – तुष्टीकरणाच्या नीतीमुळे भारताचे विभाजन झाले. तुष्टीकरणामुळे २ देशांचा सिद्धांत मांडला गेला; परंतु त्यानंतरही तुष्टीकरण थांबलेले नाही. तुष्टीकरणाला भाजपमध्ये स्थान नाही. आमचे दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत; परंतु तुष्टीकरण करणार्या काँग्रेसला भाजपसमवेत घेणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ जुलै या दिवशी भिवंडी येथील भाजपच्या मेळाव्यात केले. ‘मुस्लीम लीगलाही आम्ही समवेत घेणार नाही’, असे या वेळी फडणवीस म्हणाले.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले…
१. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जागांचे वाटप योग्य करेल. महाराष्ट्रात आम्ही १५२ हून अधिक जागा जिंकू. जे आपल्यासमवेत आले आहेत, त्या मित्रांनाही आपणाला निवडून आणायचे आहे.
२. वर्ष २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला. त्याला बेईमानीविना दुसरे काही म्हणता येणार नाही. अमित शहा यांच्यासमवेत उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या चर्चेमध्ये मुख्यमंत्रीपदाविषयी चर्चा झाली नव्हती.
३. जनादेशाची हत्या वर्ष २०१९ मध्ये कुणी केली ? त्यामुळे जेव्हा अन्याय होईल, तेव्हा एकनाथ शिंदे जन्माला येतील. शिवसेनेसमवेत आमची युती भावनात्मक आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसची आमची राजकीय युती आहे.
४. आता ज्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, ती वर्ष २०२६ मध्ये मिळू शकतील. त्याचा विचार न करता लोकसभेच्या निवडणुकीसाठी जोमाने काम करा.