‘अनंत प्लास्टिक सर्जरी’च्या वतीने रविवारी स्नेहमेळावा ! – डॉ. मयुरेश देशपांडे, प्लास्टिक सर्जन

पत्रकार परिषदेत माहिती देतांना प्लास्टिक सर्जन डॉ. मयुरेश देशपांडे (मध्यभागी), तसेच अन्य

कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्रात आधुनिकतेची कास धरून संशोधनासह कार्यरत ‘अनंत प्लास्टिक सर्जरी’ आता १० व्या वर्षात पर्दापण करत आहे. या निमित्ताने संकटग्रस्त रुग्णांना, त्यांचा जीव अथवा त्यांचे तुटलेले हात-पाय-बोटे वाचवण्याच्या दृष्टीने समायोचित मार्गदर्शन करणार्‍या समाजातील देवदूतांचा गौरव करण्यासाठी रविवार, १६ जुलैला सकाळी ११ वाजता ‘रेसिडन्सी क्लब नागाळा पार्क’ येथे स्नेहमेळावा आयोजित केला आहे. जगभरात १५ जुलै हा दिवस ‘वर्ल्ड प्लास्टिक सर्जरी डे’ म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती ‘अनंत प्लास्टिक सर्जरी’चे संचालक डॉ. मयुरेश देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी डॉ. तन्वी देशपांडे, रुग्णालयाचे प्रमुख अजित वैद्य, श्रीकांत नानिवडेकर, वैभव देशपांडे उपस्थित होते.

डॉ. मयुरेश देशपांडे पुढे म्हणाले, ‘‘या वेळी जगप्रसिद्ध सवाई मानसिंग वैद्यकीय महाविद्यालय, जयपूर येथील माजी विभागप्रमुख डॉ. प्रदीप गोईल हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. प्राचीन काळापासून सुश्रुत ऋषींना ‘प्लास्टिक सर्जरीचे जनक’ मानले जाते. त्यांनी शल्यचिकित्सेचा पुरस्कार प्रामुख्याने शरिराचा कायापालट करण्यासाठी केला. पुरातन काळात युद्धात जायबंदी झालेल्या सैनिकांचे व्यंग निवारण करण्यासाठी, तसेच चेहर्‍यावर झालेल्या जखमा, शस्त्राचे वार झाल्यामुळे विद्रूप झालेले नाक-कान, तसेच तुटलेली बोटे-हात-पाय अथवा इतर अवयव यांचे पुनर्रोपण करण्याच्या दृष्टीने शल्यचिकित्सा ही शाखा विशेष विकसित केली. त्यासाठी त्यांनी जवळपास ३०० शस्त्रक्रिया तंत्रे आणि १२५ पेक्षा अधिक आयुधांचा शोध लावला.’’