यमुनेच्या पाण्यामुळे राष्ट्रीय राजधानीत हाहा:कार !

नवी देहली – उत्तर भारतात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे देशाची राजधानी देहलीतही हाहा:कार उडाला आहे. हरियाणातील हथनीकुंड धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे यमुना नदीची पातळी ४५ वर्षांचा विक्रम मोडत २०८.६६ मीटरच्या वर गेली आहे.

१. देहलीतील सखल भाग पाण्याखाली गेला असून लाल किल्ल्याच्या भागातही पाणी घुसले आहे. यासह अनेक ठिकाणी रस्त्यावरील ट्रक आणि बस जवळपास पूर्णच बुडाल्या आहेत.

२. पुराचे पाणी अनेक इमारती आणि घरे यांत घुसले आहे.

३. येथील प्रथितयश ‘सिव्हिल लाइन्स’ भागही पाण्याखाली गेला असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकारी निवासापासून पाणी केवळ ३५० मीटर दूर आहे.

४. शहरातील चांदगिराम आखाडा, निगम बोध घाट, पांडवनगर, गांधीनगर आणि भजनपुरा या भागांतही पाणी शिरले आहे.

५. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे अनेक गट पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे कार्य करत आहेत.