सोनसोडो कचरा प्रकल्पावरून गोवा खंडपिठाचा मडगाव नगरपालिकेला आदेश
पणजी, १२ जुलै (वार्ता.) – सोनसोडोवर साचलेल्या कचर्याचे ढिगारे निकालात काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने मडगाव नगरपालिकेला दिला आहे. त्याचप्रमाणे पुढील सुनावणी होईपर्यंत नवीन बांधकामांना अनुज्ञप्ती न देण्याचा आदेशही दिला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी दक्षतेची कोणती कामे करण्यात आली आहेत ? कचरा विल्हेवाटीसाठी काय करण्यात आले आहे ? आणि काय करणे शिल्लक आहे ? यांविषयी सविस्तर अहवाल १९ जुलैपर्यंत खंडपिठाला सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. सोनसोडो येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असल्याने या विषयावरून ‘सिटीझन फॉर सोनसोडो’ आणि ‘गोवा फाऊंडेशन’ या अशासकीय संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. यावर सुनावणीच्या वेळी खंडपिठाने हा आदेश दिला. (अशासकीय संस्थांना अशा गंभीर प्रकरणांची नोंद घेऊन न्यायालयात धाव घ्यावी लागते. हीच गोष्ट पालिका आणि प्रशासन यांना का समजत नाही ? – संपादक)
सोनसोडो येथील ३० टन कचर्यावर साळगाव येथील प्रकल्पात प्रक्रिया करणार ! – मुख्यमंत्री
सोनसोडो येथील ३० टन कचर्यावर साळगाव येथील कचरा प्रकल्पात प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे शासनाने प्रतिज्ञापत्राद्वारे खंडपिठाला कळवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खंडपिठाच्या आदेशाला अनुसरून बोलतांना दिली.
(सौजन्य : Prudent Media Goa)
दोन दशकांपासून प्रलंबित सोनसोडो समस्या सुटण्याची शक्यता
सोनसोडो येथील कचर्याची समस्या ही गेल्या २ दशकांपासून आहे. या विषयावर सातत्याने राजकारणही होत आहे. (जनतेचा विचार न करता राजकारणी अशा समस्या राजकारण करण्यासाठी प्रलंबित ठेवतात का ? – संपादक) गोवा खंडपिठाच्या हस्तक्षेपानंतर आणि खंडपीठ सातत्याने यासंबंधी आदेश देत असल्याने ही समस्या आता सुटणार असल्याचे दिसून येत आहे. सोनसोडो येथे अजूनही १० टन कचरा साचलेला असून त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. पाऊस पडल्यावर कचर्याच्या ढिगार्यातून निघणारे घाणेरडे पाणी भूमीतून लोकांच्या विहिरीपर्यंत पोचण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्यात कचर्याला अनेक वेळा आग लागून ती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
कामासंबंधी अहवाल प्रतिदिन सरकारला सादर करण्याचा खंडपिठाचा आदेश
सोनसोडो प्रकल्पावरील प्रत्येक कामांच्या संबंधी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांनी सरकारला प्रतिदिन अहवाल सादर करण्याचा आदेश खंडपिठाने दिला आहे. त्याचप्रमाणे सोनसोडो कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी अभियंत्यांना नियमितपणे उपस्थित रहाणे खंडपिठाने सक्तीचे केले आहे. ‘बेलिंग’ यंत्राची कमतरता दूर करण्यासाठी नवीन यंत्र खरेदी करणे किंवा भाडेतत्त्वावर घेणे आदी उपाययोजना काढण्यास खंडपिठाने सांगितले आहे.
इतर कचरा प्रकल्पांचे साहाय्य घेऊन समस्या सोडवणार ! – देविदास पांगम, महाधिवक्ता
सोनसोडो प्रकल्पाची समस्या सोडवण्यासाठी साळगाव आणि काकोडा कचरा प्रकल्पांचे साहाय्य घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी खंडपिठाला दिली. त्यानुसार सोनसोडो येथील ३० टन कचरा प्रतिदिन साळगाव येथील प्रकल्पात पाठवण्याचा आदेश खंडपिठाने दिला आहे.
संपादकीय भूमिकाकचरा समस्येवरून न्यायालयाने नगरपालिकेला असे फटकारावे लागणे मडगाव पालिकेला लज्जास्पद ! |