‘समस्येवर तोडगा नाही, तर आपत्ती अटळ !’

सोनसोडो कचरा प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांकडून न्यायालयात निवेदन

सोनसोडो डंपच्या जुन्या समस्या तशाच, परंतु त्यात नवीन समस्यांची भर पडत आहे !

पणजी, ११ जुलै (वार्ता.) – सोनसोडो पठारावर असलेला १० सहस्र टन ओला कचरा आता वाहतूक करण्याच्या परिस्थितीत नसल्यामुळे संभाव्य आपत्ती अटळ असल्याचे प्रतिज्ञापत्र दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ‘पावसाळ्यात सोनसोडो येथे आपत्ती किंवा दुर्घटना घडणार नाही, याची कोणती दक्षता घेतली आहे ?’, या दृष्टीने दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांना कचरा साठवण्यात आलेल्या जागेची पहाणी करण्याचे आदेश दिले होते.

या दृष्टीने ११ जुलै या दिवशी न्यायालयात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी न्यायालयात अहवाल सादर केला. याविषयी राज्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी न्यायालयाला सांगितले, ‘या कचरा समस्येवर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. प्रतिदिन २७ ते ३५ टन ओला कचरा सिद्ध होतो आणि यापैकी २० टन कचर्‍यावर ‘एस्.जी.पी.डी.ए.’ कचरा प्रक्रिया प्रकल्पात प्रक्रिया केली जाते. या प्रकरणी साळगाव आणि काकोडा कचरा प्रक्रिया केंद्रांकडून साहाय्य घेतले जाणार आहे.’

संपादकीय भूमिका

अशी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ देणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. लोकप्रतिनिधी प्रतिवर्षी या ठिकाणी भेट देऊन आश्वासने देतात; पण येथील कचरा समस्या तशीच आहे !