श्री विष्‍णुस्‍वरूप परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी पोचण्‍यासाठी तेच साधकाला स्‍वभावदोष आणि प्रारब्‍ध यांवर मात करून पुढे वाटचाल करण्‍यास शक्‍ती देत असल्‍याचे लक्षात येणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री. धैवत विलास वाघमारे यांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण आल्‍यावर त्‍यांनी केलेला वैशिष्‍ट्यपूर्ण भावप्रयोग आणि त्‍या वेळी त्‍यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री. धैवत वाघमारे

१. भावप्रयोग

१ अ. नामस्‍मरण करतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे स्‍मरण होत असल्‍यामुळे मानसरित्‍या त्‍यांच्‍या खोलीत जाणे : ‘फेब्रुवारी २०२२ मध्‍ये मी नामस्‍मरण करायला बसलो होतो. तेव्‍हा मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची आठवण येत होती; म्‍हणून मी मानसरित्‍या त्‍यांच्‍या खोलीत जाण्‍यास निघालो.

१ आ. मानसरित्‍या परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या खोलीत जातांना डोळ्‍यांपुढे आलेले दृश्‍य

१ आ १. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या खोलीत जातांना ‘पायांना दगड आणि काटेकुटे टोचणे, अकस्‍मात् एका खोल खड्ड्यात पडणे, त्‍यातून बाहेर येऊन पुन्‍हा चालू लागल्‍यावर जिथून निघालो, तिथेच पुन्‍हा पोचलो’, असे वाटणे : मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या खोलीत जायला निघालो. मी तिकडे जात असतांना माझ्‍या पायांना दगड आणि काटेकुटे टोचत होते. हे दगड आणि काटेकुटे म्‍हणजे माझे स्‍वभावदोष अन् अहं होते. त्‍यामुळे माझे पाय रक्‍तबंबाळ झाले. त्‍याही अवस्‍थेत मी पुढे चालू लागलो. अकस्‍मात् मी एका खोल खड्ड्यात पडलोे. त्‍यामुळे माझे सर्व अंग ठेचले गेले. तो खड्डा म्‍हणजे मी स्‍वभावदोषांमुळे केलेली चूक होती. मी कसाबसा त्‍या खड्ड्यातून बाहेर आलो आणि पुन्‍हा पुढे चालू लागलो. तेव्‍हा ‘मी जिथून निघालो होतो, तिथेच परत पोचलो’, असे मला वाटले. असे अनेक वेळा घडले. तरी मी परात्‍पर गुरुदेवांकडे जाण्‍यासाठी पुन्‍हा चालायला लागलो.

१ आ २. पुन्‍हा उठून चालण्‍याचा प्रयत्न करतांना प्रारब्‍धाचे डोंगर लागणे आणि त्‍यांवर चढतांना अनेक वेळा घसरणे, अशा स्‍थितीत हिंस्र पशू अंगावर धावून येणे, या स्‍थितीमुळे थकून जीव अर्धमेला होणे : पुढे जातांना वाटेत मला एक डोंगर लागला. त्‍या डोंगरावर चढतांना मी अनेक वेळा खाली घसरलो. त्‍यामुळे मी पुरता थकून गेलो. तेव्‍हा ‘हा डोंगर म्‍हणजे माझे प्रारब्‍ध आहे’, हे माझ्‍या लक्षात आले. तशाही स्‍थितीत मी डोंगर चढण्‍याचा प्रयत्न करतांना अकस्‍मात् हिंस्र पशू माझ्‍या अंगावर धावून येऊन माझ्‍या शरिराचे लचके तोडू लागले. त्‍यामुळे मी अर्धमेला झालोे, तरीही मी धडपडून पुढे जाण्‍याचा प्रयत्न केला. हे हिंस्र पशू म्‍हणजे अनिष्‍ट शक्‍ती असून ‘त्‍यांचे आक्रमण आणि माझे प्रारब्‍ध यांमुळे जिथून मी चालायला आरंभ केला, तिथेच पुन्‍हा पोचत आहे. माझ्‍याकडून खरी वाटचाल झालीच नाही’, असे मला वाटले.

१ आ ३. या सर्व परिस्‍थितीत पुढे जाण्‍याचा प्रयत्न करतांना वाटेत महासागर लागणे आणि त्‍यावरून सहज चालत पुढे जाता येणे : अशा स्‍थितीत मी पुन्‍हा चालण्‍याचा प्रयत्न केल्‍यावर पुढे एक प्रचंड मोठा महासागर लागला. ‘आता यातून कसे जावे ?’, असा मला प्रश्‍न पडला. शेवटी मी त्‍या महासागरात शिरलो, तर काय आश्‍चर्य ! त्‍या पाण्‍यात न बुडता मला त्‍या पाण्‍यातूनच पुढे चालत जाता आले.

१ आ ४. महासागरात एक महाद्वार दिसणे आणि तेथे असलेल्‍या द्वारपालांनी आत न सोडणे, तेव्‍हा ‘आपण इथे का आलो ?’, हेही न आठवणे, नंतर कोणीतरी हाक मारल्‍यावर द्वारपालांनी आत जाऊ देणे : पुढे गेल्‍यावर मला एक महाद्वार लागले. तेथे २ द्वारपाल होते. त्‍यांनी माझी वाट रोखून धरली. पुष्‍कळ विनवण्‍या करूनही ते मला आत सोडत नव्‍हते. तेव्‍हा ‘आता काय करावे ? मी कशासाठी येथे आलो आणि आत जाऊन मला काय करायचे आहे ?’, तेही मला आठवत नाही’, अशी माझी स्‍थिती झाली. इतक्‍यात कोणीतरी मला हाक मारली. तेव्‍हा त्‍या द्वारपालांनी मला आत जाण्‍याचा मार्ग मोकळा करून दिला.

१ आ ५. महाद्वारातून आत गेल्‍यावर शेषशायी श्रीविष्‍णूचे दर्शन होणे आणि त्‍याचे स्‍मितहास्‍य पाहून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण होणे, तेव्‍हा ‘ते परात्‍पर गुरु डॉक्‍टरच असून त्‍यांच्‍या खोलीत पोचलो आहे’, याची जाणीव होणे : मी त्‍या महाद्वारातून चालत आत गेलो. मला समोर शेषशय्‍येवर भगवान श्रीविष्‍णु विराजमान असलेले दिसले. श्रीमहालक्ष्मी त्‍यांची चरणसेवा करत होती. मी त्‍यांना साष्‍टांग नमस्‍कार केला. श्रीविष्‍णूने माझ्‍याकडे पाहून स्‍मितहास्‍य केले. ते हास्‍य पाहून मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची आठवण आली; म्‍हणून मी आश्‍चर्याने पाहिले, तर ते दुसरे-तिसरे कोणी नसून परात्‍पर गुरु डॉक्‍टरच होते. तेव्‍हा ‘मी त्‍यांच्‍या खोलीत पोचलो आहे’, असे माझ्‍या लक्षात आले.

त्‍या वेळीे मी करत असलेल्‍या भावप्रयोगातून मी भानावर आलो.

२. भावप्रयोगातून शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. साधनेची वाटचाल करतांना साधकाला त्‍याच्‍यातील स्‍वभावदोष, अहं, प्रारब्‍ध आणि अनिष्‍ट शक्‍तींचा होणारा त्रास इत्‍यादींमुळे पुष्‍कळ अडथळे येणे अन् त्‍यातून बाहेर पडून पुढील वाटचाल करतांना तो साधनेत पुढेपुढेच जात असणे : ‘साधनेची वाटचाल करतांना स्‍वभावदोष, अहं, प्रारब्‍ध आणि अनिष्‍ट शक्‍ती इत्‍यादींमुळे मी खड्ड्यात पडत होतो, घसरत होतो किंवा अर्धमेला होत होतो, म्‍हणजे चुकांमुळे माझी साधना व्‍यय होत होती किंवा अनिष्‍ट शक्‍तींच्‍या त्रासामुळे मी थकून जात होतो, तरी त्‍यातून बाहेर येऊन मी पुन्‍हा साधनेच्‍या वाटचालीस प्रारंभ करत होतो. तेव्‍हा मला ‘मी पुन्‍हा मूळ स्‍थितीला येऊन पोचलो’, असे वाटत असले, तरी मी बरेच मार्गक्रमण केले होते’, असे माझ्‍या लक्षात आले; पण तेव्‍हा मला ते कळत नव्‍हते. प्रत्‍येक अडथळा पार केल्‍यावर मी पुढेच जात होतो.

२ आ. परात्‍पर गुरुदेवच साधकाला साधनेची वाटचाल करण्‍यासाठी शक्‍ती आणि बुद्धी देत असून सतत प्रयत्न केल्‍यास श्री गुरूंपर्यंत पोचणार असणे : मला ‘माझी जखमी आणि गलितगात्र अवस्‍था झाली आहे’, असे वाटत असले, तरी परात्‍पर गुरुदेवच मला पुढची वाटचाल करण्‍यासाठी शक्‍ती आणि बुद्धी देत आहेत. मला मार्ग तोच तोच भासत असला, तरी मी पुष्‍कळ पुढे पुढे जात होतो. त्‍यामुळे ‘मी कधी गुरुदेवांपर्यंत पोचलो’, ते मला कळलेच नाही.

गुरुदेव सर्वांची अशीच वाटचाल करवून घेत आहेत. त्‍यामुळे साधकांनी निश्‍चिंतपणे श्री गुरूंनी सांगितलेले प्रयत्न करत वाटचाल करत रहावी. शेवटी ते प्रसन्‍न होऊन आपल्‍याला त्‍यांच्‍या चरणी स्‍थान देणारच आहेत, हेच मला यातून शिकायला मिळाले.’

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.४.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक