मडगाव (गोवा) येथील पोर्तुगीजकालीन इमारतीतील आरोग्य केंद्राचा दर्शनी भाग कोसळला

आरोग्य केंद्राच्या इमारतीचा कोसळलेला दर्शनी भाग

मडगाव, ८ जुलै (वार्ता.) – मडगाव शहरातील हॉस्पिसियो रुग्णालयाजवळील पोर्तुगीजकालीन इमारतीत असलेल्या आरोग्य केंद्राचा पहिल्या मजल्याचा काही भाग पहाटे सुमारे ३ वाजता कोसळला. सुदैवाने ही घटना केंद्र चालू नसतांना घडल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. इमारतीचा काही भाग इमारतीखाली उभ्या केलेल्या एका दुचाकीवर पडल्याने दुचाकीची हानी झाली.

(सौजन्य : OHeraldo Goa) 

संततधार पावसामुळे आरोग्य केंद्राचा भाग कोसळला; मात्र आरोग्य केंद्रातील वैद्यकीय उपकरणे, धारिका, इतर कागदपत्रे आदींची हानी झालेली नाही. ही घटना दिवसा कार्यालयीन वेळेत झाली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. या ठिकाणी दिवसभर शेकडो रुग्ण आरोग्य सुविधेचा लाभ घेण्यासाठी येत असतात, तसेच या ठिकाणी आधुनिक वैद्य आणि परिचारिका हेही कामावर असतात.

आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुकोर कावूस म्हणाले, ‘‘आरोग्य केंद्राची ही इमारत वर्ष १९६१ मध्ये बांधली होती. या इमारतीची संपूर्ण देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली होती. भिंतीचा भाग कोसळला आहे, त्या ठिकाणी पाण्याची गळती नव्हती. मुसळधार पावसामुळे भिंत ओली झाल्याने कदाचित् ही घटना घडली असावी.’’ आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी घटनेची त्वरित नोंद घेऊन आरोग्य खात्याच्या संचालकांना घटनास्थळाची पहाणी करून गोवा साधनसुविधा मंडळाला याविषयी कळवण्याची सूचना केली. गोवा सरकार पुरातन वास्तूंचे संरक्षण करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. वारसा मूल्य असलेल्या सर्व सरकारी इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडीट’ करण्याची मागणी गोवा फॉरवर्ड या पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

आरोग्य केंद्र अन्यत्र हालवणार ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

आरोग्य केंद्राच्या इमारतीची स्थिती पहाता तातडीने केंद्रासाठी नवीन ठिकाण निश्‍चित केले जाणार आहे. यासाठी धारिका सिद्ध करण्याचे निर्देश आरोग्य खात्याच्या संचालकांना देण्यात आले आहे.

ही इमारत एक ऐतिहासिक वास्तू असल्याने तिचे संरक्षण करणे आवश्यक आहे. गोवा साधनसुविधा मंडळ या इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.