एका जिल्ह्यातील २ शहरांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांविषयी पोलिसांकडून चौकशी !

प्रतीकात्मक छायाचित्र
३ जुलै या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने सर्वत्र गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडला.  एका जिल्ह्यातील २ शहरांमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या गुरुपौर्णिमांविषयी पोलिसांनी सनातनच्या साधकांकडे चौकशी केली. गेली अनेक वर्षे जिल्ह्यात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येत आहे; मात्र या वेळी पोलिसांकडून प्रथमच एवढे प्रश्न विचारण्यात आल्याचे साधकांनी सांगितले.

१. एका शहरातील  सनातनच्या एका साधकाला १ जुलै या दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालयातून दूरभाष आला. या वेळी या साधकाने  सनातन संस्थेचे साधक या महोत्सवाचे आयोजन पहात असल्याचे सांगितले. यानंतर एका महिला पोलिसाने या संदर्भातील सेवा पहाणार्‍या सनातन संस्थेच्या  साधकाला दूरभाष केला आणि ‘जिल्ह्यात किती गुरुपौर्णिमा आहेत ? आयोजक कोण आहेत ? सर्व ठिकाणी वक्ते कोण आहेत ? उपस्थिती किती असणार?’, असे प्रश्न विचारले. यावर संबंधित साधकाने ‘मी स्वतः या गुरुपौर्णिमेचे आयोजन पहात असून स्थानिक लोकांचे साहाय्य घेऊन महोत्सव साजरे करतो’, असे सांगितले.

२. याच जिल्ह्यातील अन्य एका शहरातील एक साधक यांना पोलिसांनी दूरभाष करून पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. या वेळी साधकाने ‘मला वेळेअभावी येणे शक्य नाही’, असे सांगितले. त्यावर पोलिसांनी ‘तुमचे आयोजक कोण आहेत ? वक्ते कोण आहेत ? या शहरात असलेल्या साधकांची नावे काय आहेत ?’, असे प्रश्न विचारले.’

(सनातन संस्था गेली अनेक वर्षे अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे. सनातन संस्थेचे आजपर्यंत झालेले गुरुपौर्णिमा सोहळे हे जाहीरच होते. असे असतांना पोलिसांनी अशा प्रकारे अन्वेषण करण्याचे कारण काय ? गुरु-शिष्य परंपरा हेच भारतीय संस्कृतीचे मूळ असून त्यामुळे समाजाची सात्त्विकता वाढून समाजात गुन्हेगारी अल्प होऊन पोलीस प्रशासनास साहाय्य होणार आहे. असे असतांना एका अध्यात्मप्रसार करणार्‍या संस्थेचे अन्वेषण कशासाठी ? पोलिसांनी असे अन्वेषण धर्मांधांच्या कार्यक्रमांचे कधी केले आहे का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

देशद्रोही आतंकवाद्यांची नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांसाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणार्‍या सनातन संस्थेची चौकशी करणारे पोलीस!