‘महाराष्ट्र सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती (२८ मे) हा दिवस ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन’ म्हणून साजरा करावा’, असे घोषित करून त्यांचा शासकीय महापुरुषांच्या सूचीमध्ये समावेश केला. यासंदर्भात शासकीय स्तरावरून एक परिपत्रक काढून ते सर्वत्र प्रसारित केले. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती २८ मे, तर त्यांची पुण्यतिथी २६ फेब्रुवारी या दिवशी असते. साधारणतः महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी या शाळा अन् महाविद्यालये यांच्या स्तरावरच साजर्या केल्या जातात. काही शासकीय कार्यालयांमध्ये केवळ प्रतिमेला पुष्पहार घालण्यात येतो .
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आणि पुण्यतिथी असते, तो शिक्षण महामंडळे, विद्यापिठे आणि शैक्षणिक संस्था यांच्या वार्षिक परीक्षांचा काळ असतो किंवा मेमध्ये विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागलेल्या असतात. त्यामुळे नवीन पिढीसमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन चरित्र पोचू शकत नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालये आणि अन्य सामाजिक संस्था यांमध्ये ८ जुलै हा दिवस ‘साहसदिन’ म्हणून सर्वत्र साजरा करण्यात यावा; कारण या काळात सर्व शैक्षणिक संस्था आणि त्यांचे वर्ग कार्यरत असतात.
८ जुलै १९१० या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटीश पोलिसांच्या कह्यात असतांना ‘मोरिया’ आगनावेतून (जहाजातून) प्रवास करत होते. तेव्हा त्यांच्या कह्यातून सुटण्यासाठी त्यांनी सागरामध्ये झेप घेऊन जीवावर बेेतू शकणारा पराक्रमी दिग्विजय केला होता. ही घटना फ्रान्सच्या मार्सेलिस बेटावर घडली. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला आला आणि स्वातंत्र्याच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय क्षेत्रात बर्याच प्रमाणात अनुकूल विचार चालू झाले. त्याचा लाभ पुढे आझाद हिंद सेना आणि गदर आंदोलन यांना मोठ्या प्रमाणात झाला. या पार्श्वभूमीवर केवळ महाराष्ट्र सरकारनेच नव्हे, तर केंद्र सरकारनेही याविषयी चिंतन करून ८ जुलै हा दिवस राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ‘साहसदिन’ म्हणून घोषित करावा, तसेच तो सर्वत्र साजरा करण्याचे निश्चित करावे. या दिनाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित कथाकथन, नाट्य, परिसंवाद, शौर्य स्पर्धा, निबंध लेखन, चित्रकला प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री प्रयोग, पुस्तक वाचन, प्रश्नमंजुषा आदी उपक्रम सोयीनुसार घेऊ शकतो. त्यामुळे या महापुरुषाचे चरित्र युवा पिढीपर्यंत पोचणे सुलभ होईल.’
– प्रा. श्याम देशपांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, बढे चौक, वर्धा. (१.७.२०२३)