वचक किंवा धाक हवाच !

सौंदर्यवर्धनालयात येणार्‍या महिलांना इंजेक्‍शनद्वारे बेशुद्ध करून त्‍यांच्‍यावर बलात्‍कार करणार्‍या तिघांना इराण सरकारने फाशी दिली. यात एक आधुनिक वैद्य (डॉक्‍टर) आणि त्‍याचे २ साहाय्‍यक यांचा समावेश आहे. हे गुन्‍हेगार बलात्‍काराच्‍या घटनांची छायाचित्रे आणि व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित करून पीडित महिलांना ‘ब्‍लॅकमेल’ करायचे. नोव्‍हेंबर २०२१ मध्‍ये त्‍यांना पकडण्‍यात आले आणि २० मासांत त्‍यांना फाशी देण्‍यात आली. न्‍यायालयाने त्‍यांना बलात्‍काराच्‍या ७ प्रकरणांत दोषी ठरवले होते. त्‍यांच्‍यासारखी कृत्‍ये करणार्‍यांना या शिक्षेमुळे वचक बसणार, हे निश्‍चित ! सौदी अरेबियाने ५ गुन्‍हेगारांना नुकतीच फाशीची शिक्षा दिली. या वर्षातील ही तेथील सर्वांत मोठी सामूहिकरित्‍या दिलेली फाशीची शिक्षा आहे. हे सर्व आरोपी धार्मिक स्‍थळावरील प्राणघातक आक्रमणात सहभागी होते. सौदी अरेबियाने या वर्षात एकूण ६८ जणांना फाशी दिली. गेल्‍या वर्षी एकूण १४७ जणांना फाशी दिली होती, तर वर्ष २०२१ मध्‍ये ६९ जणांना फाशी दिली होती.

भारतात बलात्‍कारांची वाढती संख्‍या !

भारतात बलात्‍काराच्‍या प्रकरणांत काहींना फाशीची शिक्षा घोषित केली जाते; पण ती दिली जात नाही, तर काही वेळेला फाशीसाठी पर्याय शोधले जातात. भारतात काही मासांची मुलगी ते ८० वर्षांची वृद्ध महिला यांच्‍यावर बलात्‍कार झाल्‍याच्‍या घटना आढळल्‍या आहेत. बलात्‍कार करण्‍याचे प्रकारही अतिशय घृणास्‍पद आणि विकृत असतात. त्‍यामुळे बलात्‍कार पीडितांच्‍या मानसिक स्‍थितीची कल्‍पना करता येईल. ती तरुणी जिवंतपणी मृत झाल्‍याप्रमाणे आयुष्‍य जगत असते. काही घटनांमध्‍ये तर बलात्‍कार करून तरुणीची हत्‍या करण्‍यासारखे भयंकर कृत्‍य केले जाते. काही आरोपी फरार होतात, तर काही आरोपी जामिनावर सुटतात अन् पुन्‍हा बलात्‍कार करायला मोकळे होतात. गुन्‍हेगारीचे हे दुष्‍टचक्र आपण आणखी किती काळ चालू देणार आहोत ? गुन्‍हा मान्‍य करणे, खंत किंवा पश्‍चात्ताप वाटणे हे तर कधीच होत नाही. शिक्षेचे भय असेल, तरच समाजामध्‍ये कायदा आणि सुव्‍यवस्‍था राखली जाऊ शकते, जर ते भयच गुन्‍हेगारांना नसेल, तर ते मोकाट सुटून वारंवार तीच घृणास्‍पद कृत्‍ये करतील.

गुन्‍हेगारी आणि विकास अशक्‍य !

इराणमध्‍ये वर्ष २०२३ मध्‍ये आतापर्यंत वेगवेगळ्‍या गुन्‍ह्यांसाठी ३५४ जणांना फाशी देण्‍यात आली. भारतात तर हे प्रमाण अगदीच नगण्‍य असेल. त्‍यातही एखाद्याला फाशीची शिक्षा घोषित झाली की, सगळे मानवाधिकारवाले, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी शिक्षेच्‍या विरोधात एकवटतात; कारण त्‍यांच्‍या दृष्‍टीने एखाद्याला फाशी देणे हे माणुसकीच्‍या तत्त्वात न बसण्‍यासारखे आहे. येथे त्‍याच्‍या गुन्‍ह्याच्‍या तीव्रतेचा कुणीही विचार करत नाही. उलट गुन्‍हेगारी वृत्तीचीच सदासर्वकाळ पाठराखण केली जाते. गुन्‍हेगारांविषयी माणुसकी, कळवळा वाटतो, त्‍यांच्‍याविषयीचे प्रेम ऊतू जाते, मग हीच संवेदनशीलता पीडितांसाठी का नसते ? मानवाधिकारवाले बहुतांश वेळा आरोपींच्‍या बाजूने असल्‍याचे आपल्‍याला आढळते; पण पीडित व्‍यक्‍तींच्‍या बाजूने हे मानवाधिकारवाले उभे राहिले आणि त्‍यांनी पीडितांना न्‍याय मिळवून दिला, अशा घटनांचे प्रमाण अगदीच नगण्‍य आहे. हे खरोखर भयंकर आणि तितकेच विनाशकारीही आहे. नशेच्‍या औषधांची तस्‍करी केल्‍यास इराण, सौदी अरेबिया, चीन, व्‍हिएतनाम, मलेशिया, सिंगापूर यांसह बर्‍याच देशांमध्‍ये फाशी दिली जाते. भारतात तर अमली पदार्थ तस्‍करीचे जाळे पसरले आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे. त्‍याच्‍यावर नियंत्रण कधी आणि कोण आणणार ? अन्‍य देशांना जे जमते, ते शक्‍तीशाली होऊ पहाणार्‍या भारताला का जमत नाही ? गुन्‍हेगारीच्‍या पायावर विकासाचा डोलारा कधीच उभा राहू शकणार नाही, हे भारत सरकारने लक्षात घ्‍यावे आणि या घातकी मानसिकतेची गांभीर्याने नोंद घेऊन आरोपींना त्‍यांच्‍या गुन्‍ह्याच्‍या अनुषंगाने लवकरात लवकर कठोर, तसेच वेळप्रसंगी फाशीची शिक्षा होण्‍यासाठीही प्रयत्न करायला हवेत. नीतीवान आणि सद़्‍गुणी समाज राष्‍ट्र घडवतो. त्‍यामुळे असा समाज घडवण्‍याचे दायित्‍व हे शासनकर्त्‍यांचे असते. असा समाज हवा असेल, तर समाजात गुन्‍हेगारी वृत्तीला थारा असता कामा नये. यासाठीच कठोर शिक्षा सुनावणे आणि त्‍याची कार्यवाही करणे, याकडे सरकारने लक्ष देणे आवश्‍यक आहे.

गुन्‍हेगारीमुक्‍त देश आणि जनतेचे दायित्‍व !

छत्रपती शिवाजी महाराज

भारतीय इतिहास प्रेरणादायी, जाज्‍वल्‍य, तसेच वैभवशाली का ठरला ? तर त्‍याकाळी नीतीमानता होती, अराजक कुठेही नव्‍हते. कुणी जरी चुकला, तरी त्‍याला प्रायश्‍चित्त भोगावे लागायचे किंवा दंडही द्यावा लागायचा. तीव्र गुन्‍ह्यानुसार कठोर शिक्षाही दिली जायची. यामुळे प्रत्‍येक जण शिक्षेच्‍या धाकात असायचा; म्‍हणूनच तर सज्‍जनांचे पालकत्‍व घेणारे आणि गुन्‍हेगारांना कठोर शिक्षा देणारे छत्रपती शिवाजी महाराज ‘आदर्श शासनकर्ता’ म्‍हणून ओळखले जातात. तो धाक, वचक किंवा आदरयुक्‍त भीती कुणात उरलेलीच नाही. त्‍यामुळे सर्वत्र मनमानी वाढून अराजक निर्माण होत आहे. प्रसार आणि प्रसिद्धी माध्‍यमांनीही यात महत्त्वाची भूमिका बजावण्‍याची आवश्‍यकता आहे. समाजाला काय आवडेल, यापेक्षा समाजासाठी काय आवश्‍यक आहे, ते देण्‍याचे दायित्‍व या माध्‍यमांचे आहे; पण होते उलटेच ! त्‍यामुळे माध्‍यमांवरही विसंबून रहात येत नाही. जनता तर सूज्ञ आहे. तिला योग्‍य-अयोग्‍य याची जाण आहे. जनतेनेच पुढाकार घ्‍यायला हवा. गुन्‍हेगारांच्‍या मानसिकतेत पालट घडवणे हे शक्‍य नसते. त्‍यामुळे जनतेनेच आता आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्‍यासाठी सरकारकडे पाठपुरावा करायला हवा. तसे केल्‍यास एक ना एक दिवस देश नक्‍कीच गुन्‍हेगारीमुक्‍त होईल. अन्‍य देशांच्‍या उदाहरणांतून बोध घेऊन भारताने गुन्‍हेगारीमुक्‍त भारताची निर्मिती करून विश्‍वगुरुपदी विराजमान व्‍हावे !

गुन्‍हेगारांना कठोर शिक्षा देण्‍याचा कणखर निर्णय घेणार्‍या अन्‍य देशांकडून भारताने बोध घेणे आवश्‍यक !