उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. देवश्रुत अमेय भालेराव ही या पिढीतील एक आहे !
आषाढ कृष्ण सप्तमी (९.७.२०२३) या दिवशी चि. देवश्रुत अमेय भालेराव याचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आजी आणि आत्या यांच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. देवश्रुत अमेय भालेराव याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. श्रीमती जयश्री भालेराव (चि. देवश्रुतची आजी), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१ अ. चांगली निरीक्षणक्षमता : ‘चि. देवश्रुतची दृष्टी पुष्कळ स्थिर आहे. तो समोर दिसणारी प्रत्येक कृती एकाग्रतेने पहातो. त्याची निरीक्षणक्षमता पुष्कळ चांगली आहे.
१ आ. देवाची ओढ
१. तो १ – २ मासांचा असतांना एकदा अकस्मात् पुष्कळ रडू लागला. त्या वेळी मी त्याला देवाचे चित्र दाखवले. तेव्हा तो शांत झाला. आम्ही गोवा येथे माझ्या मुलीच्या (सौ. स्वराली नाईक हिच्या) नणंदेच्या लग्नाला गेलो होतो. तेथे घरात पुष्कळ गर्दी होती. सर्व जण देवश्रुतला घेत होते. तेव्हा तो रडायला लागला. मी त्याला त्यांच्या देवघरात नेले. तेव्हा तो लगेच शांत झाला आणि खेळायला लागला.
२. तो माझ्या समवेत किंवा त्याच्या वडिलांच्या (श्री. अमेय भालेराव यांच्या) समवेत देवपूजा करायला बसतो.
३. देवश्रुतशी खेळतांना मला अन्य कोणत्याही विषयांवर बोलण्यापेक्षा देवाविषयीच बोलावेसे वाटते. त्यामुळे माझा नामजप आपोआप होतो.
१ इ. नामजप आणि स्तोत्र म्हणतांना प्रतिसाद देणे : मी देवासमोर दिवा लावून झाल्यावर ‘श्रीगणेशाय नमः ।’ असा नामजप किंवा स्तोत्र म्हणते. तो ३ – ४ मासांचा असल्यापासून मी नामजप करतांना किंवा स्तोत्र म्हणतांना मला प्रतिसाद देतो आणि मनापासून स्तोत्र ऐकतो.
१ ई. सनातनचे तीन गुरु आणि संत यांच्याप्रती भाव : एकदा मी त्याला सनातनच्या तिन्ही गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) एकत्रित छायाचित्र दाखवले. तेव्हा त्याने त्या छायाचित्रावर झेप घेतली. त्याने छायाचित्र हातात पकडले अन् तो त्याकडे पाहू लागला. देवश्रुत ४ मासांचा असतांना मी त्याला घेऊन देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी सद़्गुरु राजेंद्र शिंदे आणि पू. रमेश गडकरी भोजनकक्षात होते. पू. गडकरीकाकांनी त्याला घेतल्यावर तो एकदम शांत झाला. सद़्गुरु राजेंद्रदादांनी त्याला घेतल्यावर त्याने हुंकार देऊन त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद दिला.
‘हे श्री गुरुदेवा, आपणच हा सात्त्विक जीव माझ्या साधनेसाठी आमच्याकडे पाठवला आहे. आपणच आमच्याकडून त्याचे आपल्याला अपेक्षित असे संगोपन करून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
२. वैद्या (सौ.) स्वराली स्वप्नील नाईक (चि. देवश्रुतची आत्या), मडकई, गोवा.
२ अ. देवश्रूत रडत असतांना नामजप किंवा भावजागृतीचा प्रयोग केल्यावर शांत होणे : तो १५ दिवसांचा असतांना मी माहेरी पोलादपूर येथे गेले होते. त्या वेळी तो रात्री रडत असे; परंतु आम्ही नामजप किंवा भावजागृतीचा प्रयोग केल्यावर तो लगेच शांत होत असे.
२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : एकदा रात्री तो रडत असतांना मी ‘प.पू. गुरुदेव घरी आले आहेत. ते आपल्या समवेत आहेत’, असा भावजागृतीचा प्रयोग करत होते. तेव्हा एका क्षणी त्याने हात जोडल्याची मुद्रा केली.
२ इ. त्याला संस्कृत श्लोक ऐकण्याची आवड आहे.
२ ई. नामजपाची मुद्रा करणे : एकदा तो खेळत असतांना त्याने मधेच नामजपाची मुद्रा (तर्जनी आणि अंगठा जोडल्याची मुद्रा) केली. त्या वेळी ‘त्याला नामजपासंबंधी सांगायचे आहे’, असे आम्हाला (मला, आईला आणि माझी मैत्रीण वैद्या (कु. ) शर्वरी बाक्रे हिला) जाणवले.
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २२.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |