वर्ष २०२३ च्‍या गुरुपौर्णिमेच्‍या सेवांमधील संभाव्‍य अडचणी लक्षात घेऊन त्‍यांवर केलेले आध्‍यात्मिक उपाय

‘या वर्षी ३.७.२०२३ या दिवशी गुरुपौर्णिमा होती. ‘सनातन संस्‍था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्‍या वतीने देशभरात अनुक्रमे ७२ अन् ८३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सव’ भावपूर्ण वातावरणात साजरे करण्‍यात आले. गेल्‍या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन ‘या कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यापासून ते कार्यक्रम पार पडेपर्यंत त्‍यांमध्‍ये कोणतेही अडथळे येऊ नयेत’, यासाठी आधीच आध्‍यात्मिक उपाय शोधण्‍यात आले. त्‍यांमध्‍ये ‘नामजप कोणता करायचा ? शरिरावर तळहाताने न्‍यास कुठे करायचा ? प्रतिदिन किती घंटे उपाय करायचे ? आणि कोणत्‍या दिवसापासून ते कोणत्‍या दिवसापर्यंत उपाय करायचे ?’, हे ठरवण्‍यात आले. याची माहिती पुढील सारणीमध्‍ये देण्‍यात आली आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. वक्‍त्‍यांच्‍या ध्‍वनीचित्रीकरणामध्‍ये येऊ शकणार्‍या अडचणी दूर होण्‍यासाठी केलेल्‍या उपायांचा झालेला परिणाम

गुरुपौर्णिमेच्‍या कार्यक्रमात वक्‍त्‍यांच्‍या भाषणांचे आधीच चित्रीकरण करून ते दाखवायचे होते. यासाठी ठिकठिकाणच्‍या साधक-वक्‍त्‍यांचे ते असलेल्‍या आश्रमांत चित्रीकरण करण्‍यात आले; पण कुठेही चित्रीकरण करण्‍यामध्‍ये अडचण आली नाही. केलेले चित्रीकरण संकलित करण्‍यामध्‍ये मात्र एके ठिकाणी पुढील अडचण आली.

१ अ. सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांच्‍या भाषणाचे काही भागांमध्‍ये केलेले चित्रीकरण संगणकावर एकमेकांना जोडण्‍यात अडचण येणे आणि ‘महाशून्‍य’ हा नामजप करत तेथील त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढल्‍यावर तो अडथळा दूर होणे : १.७.२०२३ या दिवशी सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांच्‍या भाषणाचे चित्रीकरण काही भागांमध्‍ये करण्‍यात आले. चित्रीकरण झाल्‍यानंतर ते सर्व भाग एकमेकांना संगणकावर जोडायचे होते. त्‍या वेळी सर्व भाग जोडले गेले; पण शेवटचा भाग जोडण्‍यात अडचण येत होती. मला ही अडचण सांगितल्‍यावर मला माझे डोके आणि चेहरा यांवर त्रासदायक शक्‍तीचे आवरण जाणवले. (‘एखादी अडचण सांगितल्‍यावर मी त्‍या प्रसंगाशी सूक्ष्मातून एकरूप होतो. तेव्‍हा तेथे अनिष्‍ट शक्‍तींनी सोडलेल्‍या त्रासदायक शक्‍तीच्‍या आक्रमणामुळे जे आवरण आलेले असते, ते मला माझ्‍या शरिराच्‍या एखाद्या भागावर जाणवते. ते आवरण नामजप करत दूर केल्‍यावर तेथील अडचण सुटते’, असा माझा अनुभव आहे.) मी ते आवरण ‘महाशून्‍य’ हा नामजप १५ मिनिटे केल्‍यावर दूर झाले. तेव्‍हा लगेचच तेथील अडचण सुटली.

२. वक्‍त्‍यांचे ध्‍वनीचित्रीकरण, त्‍याचे संकलन आणि ते संकेतस्‍थळावर ठेवणे (‘अपलोड’ करणे) यांच्‍याशी संबंधित अन्‍य कुठल्‍याही सेवांमध्‍ये कुठल्‍याही अडचणी आल्‍या नाहीत.

३. देहली येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम दाखवण्‍यासाठी लावलेला ‘प्रोजेक्‍टर’ चालू होत नसणे आणि त्‍याच्‍या उजवीकडे विभूती फुंकून अन् रिकामा खोका त्‍या दिशेकडे तोंड करून लावून तेथून येणारी त्रासदायक शक्‍ती नष्‍ट झाल्‍यावर ‘प्रोजेक्‍टर’ चालू होणे

देहली येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम ‘प्रोजेक्‍टर’द्वारे अन्‍य ठिकाणी बसलेल्‍या साधकांना दाखवायची सोय करायची होती. गुरुपौर्णिमेच्‍या आदल्‍या दिवशी त्‍याची सिद्धता करतांना तेथील ‘प्रोजेक्‍टर’ चांगला असूनही चालत नव्‍हता. ही अडचण तेथील साधकांनी मला सांगितल्‍यावर मला जाणवले, ‘त्‍या ‘प्रोजेक्‍टर’च्‍या उजवीकडून ‘प्रोजेक्‍टर’वर त्रासदायक शक्‍ती येत आहे.’ मी तेथील साधकांना त्‍या दिशेकडे विभूती फुंकायला सांगितली, तसेच त्‍या दिशेने तोंड करून रिकामा खोका येणारी त्रासदायक शक्‍ती खेचून घेण्‍यासाठी लावायला सांगितला. तसे केल्‍यावर तेथील ‘प्रोजेक्‍टर’ चालू झाला.

४. वाराणसी येथे गुरुपौर्णिमेच्‍या कार्यक्रमाचा प्रसार करणार्‍या, तसेच कार्यक्रमाच्‍या अन्‍य सेवांमध्‍ये सहभागी असणार्‍या साधकांसाठी सामूहिक नामजपादी उपाय केल्‍यावर त्‍यांना येणारी ग्‍लानी दूर होणे

वाराणसी येथे गुरुपौर्णिमेच्‍या आदल्‍या दिवशी त्‍या कार्यक्रमाचा प्रसार करणार्‍या, तसेच कार्यक्रमाच्‍या अन्‍य सेवांमध्‍ये सहभागी असणार्‍या साधकांना पुष्‍कळ ग्‍लानी येत होती. मला ही अडचण तेथील सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी सांगितली. तेव्‍हा मी ‘निर्गुण’ हा नामजप करत त्‍या साधकांसाठी २० मिनिटे सामूहिक नामजपादी उपाय केले. त्‍यानंतर त्‍या साधकांना येणारी ग्‍लानी दूर झाल्‍याचे त्‍यांनी मला कळवलेे.

५. महाराष्‍ट्र आणि गोवा या राज्‍यांत बर्‍याच ठिकाणी पाऊस पडत होता. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्‍याचे हवामान विभागाने घोषित केले होते; पण गुरुपौर्णिमेच्‍या कार्यक्रमाच्‍या कालावधीत पावसाचा जोर अल्‍प झाल्‍याने कुठल्‍याच ठिकाणी गुरुपौर्णिमेच्‍या कार्यक्रमाला उपस्‍थित रहाण्‍यास कुणाला अडचण आली नाही.

अशा तर्‍हेने श्री गुरूंनीच आमच्‍याकडून आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करून घेतले आणि संभाव्‍य अडचणी, तसेच प्रत्‍यक्ष आलेल्‍या अडचणी दूर केल्‍या. यासाठी आम्‍ही सर्व साधक श्री गुरुचरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो !’

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (७.७.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक