रत्नागिरी जिल्ह्याला आज ‘रेड’, तर पुढील ३ दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ची चेतावणी

रत्नागिरी – भारतीय हवामान विभागाकडून पर्जन्यविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार आज ६ जुलै या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ वर्तवण्यात आला आहे. या दिवशी जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ७, ८ आणि ९ जुलै या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ची चेतावणी देण्यात आली आहे. तसेच या अलर्टच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी सावधानतेच्या आणि सुरक्षितेच्या दृष्टीने कार्यरत रहावे, तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • ‘रेड अलर्ट’ म्हणजे जेव्हा एखाद्या भागात अतीमुसळधार किंवा अतीवृष्टीचा अंदाज असतो अशा वेळी ‘रेड अलर्ट’ दिला जातो. यामध्ये मोठ्या संकटाची शक्यता असल्यामुळे  नागरिकांनी शक्यतो घरी रहावे, अशा सूचना दिल्या जातात.
  • ‘ऑरेंज अलर्ट’ म्हणजे अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. इतकेच नाहीतर ऑरेंज अलर्ट असेल, तेव्हा नागरिकांनाही आवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात.