‘शिवभक्ताच्या रूपात आलेल्या शिवाने गुरुपौर्णिमेचा उल्लेख करून ‘तो आदिगुरु आहे’, याची जाणीव करून देणे आणि ‘त्या माध्यमातून शिवाने सनातन संस्थेला मोठा आशीर्वाद दिला’, असे वाटणे
१. आदिगुरु शिव आणि त्याचे शिष्य !
‘महर्षि व्यासांच्याही आधीपासून शिव आहे. शिव अनादि आणि अनंत आहे. तो आदिगुरुही आहे. शिव आदिगुरु असल्यानेच त्याने ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असलेले ‘सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार’ या ४ ॠषींना ‘शिष्य’ म्हणून स्वीकारून त्यांना मार्गदर्शन केले. शिवाच्या या गुरुरूपाला आपण ‘दक्षिणामूर्ती’ म्हणतो.
२. ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी आदिगुरु शिव उपस्थित रहातील’, असे वाटणे
दक्षिण भारतातील प्रत्येक शिवमंदिरात मंदिराच्या प्रांगणात दक्षिणामूर्ती शिवाची मूर्ती असतेच. त्या शिवभक्ताच्या रूपात आलेल्या शिवाने गुरुपौर्णिमेचा उल्लेख करून ‘तो आदिगुरु आहे’, याची आम्हाला जाणीव करून दिली. मला वाटले, ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी साक्षात् आदिगुरु शिवच उपस्थित रहातील. शिवाने या माध्यमातून सनातन संस्थेला मोठा आशीर्वाद दिला.’ आज मनुष्यरूपात प्रत्यक्ष शिवाने दर्शन दिले. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव एकदा मला म्हणाले होते, ‘‘पुढे स्थुलातील आपत्काळ चालू होईल, तेव्हा वाईट शक्ती स्थुलातून त्रास देण्यासाठी मनुष्यरूपात येतील, तशा देवतासुद्धा आशीर्वाद देण्यासाठी मनुष्यरूपात येतील.’’
गुरुदेवांच्या वाक्यांची प्रचीती आम्ही घेतली. त्या शिवशंभूच्या चरणी कोटीशः नमन !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१.७.२०२३)
सप्तर्षींनी सांगितले, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी पंचमहाभूतांशी संबंधित शिवक्षेत्रांचे दर्शन घ्यायचे आहे.’ सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आरंभी पृथ्वीतत्त्वाशी संबंधित कांचीपूरम् येथील प्रसिद्ध एकांबरेश्वर शिव मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या. त्या वेळी शिवभक्ताच्या रूपात साक्षात् शिवाने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना मंदिरात दर्शन दिल्याप्रमाणे जाणवलेला प्रसंग येथे देत आहे.
१. १.७.२०२३ या दिवशी त्रयोदशी असल्याने शिवमंदिरात प्रदोष पूजा असते. या वेळी शनिवारी प्रदोष असल्याने पूजा वैशिष्ट्यपूर्ण होती. ‘शनिवारी प्रदोष असल्यास त्या दिवशी शनीची पीडा असलेल्या व्यक्तींनी शिवाची पूजा केल्यास त्यांना असलेली शनीची पीडा दूर होते’, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
२. कांचीपूरम् येथील एकांबरेश्वर मंदिरात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ गेल्यावरचा घटनाक्रम !
२ अ. आज श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ बराच वेळ नामजपाला बसल्या होत्या. त्यांना मंदिरातून निघावेसे वाटत नव्हते.
२ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आणि साधक मंदिरातून बाहेर आल्यावर कपाळावर शिवभक्ताप्रमाणे त्रिपुंड्र (टीप) आणि काळा वर्ण असलेल्या व्यक्तीने येऊन संवाद साधणे : आम्ही (मी (श्री. विनायक शानभाग) आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ) मंदिरातून बाहेर आल्यावर एकीकडे उभे होतो. पादत्राणे ठेवलेल्या ठिकाणी पाऊस पडून चिखल झाल्याने सहसाधक पादत्राणे आणायला गेले होते. तितक्यात एक अनोळखी व्यक्ती आमच्या जवळ आली. तिच्या कपाळावर शिवभक्ताप्रमाणे त्रिपुंड्र (टीप) होते. ती उंच असून वर्ण काळा होता. ती आमच्याशी बोलू लागली.
(टीप : कपाळावर ओढलेले भस्माचे ३ आडवे पट्टे)
२ आ १. शिवभक्तांनी ‘गुरुपौर्णिमा’ कुठे साजरी होणार आहे ?’, हे विचारून स्वतः गुरुपौर्णिमेला जाणार असल्याचे सांगणे अन् पादत्राणे काढून श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना नमस्कार करणे
शिवभक्त : २ दिवसांनी ‘व्यास पौर्णिमा’ आहे. तुम्हाला ती ठाऊक असेल ना ? तिलाच गुरुपौर्णिमा म्हणतात. ‘कांचीपूरम् येथे ‘गुरुपौर्णिमा’ कुठे साजरी करणार आहेत ?’, हे ठाऊक आहे का ? ‘व्यास महर्षि किती महान ॠषि होते !’, तुम्हाला ठाऊक असेल ना ?
श्री. विनायक शानभाग : ‘कांचीपूरम् येथे कुठे गुरुपौर्णिमा साजरी करणार आहेत ?’, हे ठाऊक नाही. आम्ही बाहेरून आलो आहोत. (इतक्यात शिवभक्तांनी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे पाहून पादत्राणे काढली आणि त्यांना नमस्कार केला.)
शिवभक्त : व्यास पौर्णिमा महत्त्वाची आहे आणि मी जाणार आहे.
२ आ २. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची पादत्राणे आणायला गेलेल्या साधकांनी दूरून खूण करून सांगितले की, ‘त्यांची पादत्राणे दिसत नाहीत. त्यांची पादत्राणे कुणीतरी नेली असल्याची शंका आहे.’
२ आ ३. यात १ – २ मिनिटांचाच कालावधी गेला असेल. तेवढ्यात आम्हाला ती व्यक्ती कुठेही दिसेना. आम्ही तिला बर्याच दूर अंतरापर्यंत शोधले; पण ती अदृश्य झाल्यासारखी वाटले.
२ आ ४. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘मला ती व्यक्ती तमिळ भाषेत काय बोलत आहे ?’, ते समजत नव्हते; पण मला वाटत होते, ‘तिचे बोलणे शांतपणे ऐकत रहावे. साक्षात् भगवान शिवच त्या व्यक्तीच्या रूपात आले होते आणि आता ते अदृश्य झाले.’’
२ आ ५. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे बोलणे ऐकून साधकाच्या शरिरावर रोमांच येणे : हा प्रसंग घडत असतांना आम्ही मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे शिवभक्ताचे बोलणे ऐकत होतो; मात्र जेव्हा ती व्यक्ती अदृश्य झाली, तेव्हा ‘हा प्रकार निराळा आहे’, हे लक्षात आले. जेव्हा श्रीचित्शक्ति म्हणाल्या की, ‘ती व्यक्ती साक्षात् शिव होती’, तेव्हा शरिरावर रोमांच आले. थोडा वेळ काही सुचत नव्हते.
२ आ ६. साधकांनी महादेवाच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करणे : आम्ही महादेवाला शरण जाऊन त्याच्या चरणी प्रार्थना केली. स्वयं शिव श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना भेटायला आला होता आणि श्रीचित्शक्ति यांच्या कृपेने आम्हा साधकांनाही त्याचे दर्शन झाले होते. वरील सर्व प्रसंग ७ – ८ मिनिटांत घडला.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यासाठी नवी पादत्राणे घेऊन घरी येतांना आकाशातून पुष्पवृष्टी होते, तसा पाऊस येणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची पादत्राणे न मिळाल्याने आम्ही तसेच तेथून निघालो. त्यांच्यासाठी नवी पादत्राणे घेतली. घरी परततांना आकाशातून पुष्पवृष्टी होते, तसा पाऊस आला.
४. रात्री पू. ॐ उलगनाथन्जी यांचा भ्रमणभाष येणे
घरी पोचल्यानंतर रात्री पू. ॐ उलगनाथन्जी यांचा भ्रमणभाष आला. मी त्यांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. तेव्हा ते म्हणाले,
अ . ‘‘स्वयं शिवच श्रीचित्शक्ति यांना भेटायला आले होते.
आ. ‘पादत्राणे कुणीतरी नेणे’, हा शुभशकुन आहे. आलेले संकट दूर झाले.
इ. महर्षि विचारत आहेत की, ‘हे सर्व झाल्यावर घरी जातांना पुष्पवृष्टी झाल्यासारखा पाऊस आला ना ?’’
(‘यातून सप्तर्षींची सर्वज्ञता लक्षात येते.’ – संकलक)
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), कांचीपूरम्, तमिळनाडू. (१.७.२०२३)
|