सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये साकारणार शिवराज्याभिषेक आणि स्वातंत्र्य चळवळीचे देखावे !

सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये शिवराज्याभिषेकासारखे देखावे सादर करण्यास प्रोत्साहन देणारा निर्णय स्तुत्य ! 

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यशासनाकडून स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठीचे निकष आणि गुणांची वर्गवारी घोषित केली आहे. यामध्ये शिवराज्याभिषेक आणि स्वातंत्र्य चळवळ यांविषयीचे देखावे निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यासाठी सर्वांधिक गुण ठेवले आहेत.

यामध्ये एकूण १५० गुण आहेत. पर्यावरणपूरक मूर्तीसाठी १० गुण, पर्यावरणपूरक सजावटीसाठी १५ गुण, ध्वनीप्रदूषण रहित वातावरणासाठी ५ गुण, सामाजिक सलोख्याविषयी सजावटीसाठी २० गुण, सामाजिक कार्यासाठी २० गुण अशा प्रकारे गुण देण्यात आले आहेत. यामध्ये उत्सवाच्या ठिकाणी येणार्‍या भाविकांसाठी पाणी, आरोग्य, प्रसाधनगृह आदी सुविधा देणार्‍या मंडळ आणि राज्याभिषेक अन् स्वातंत्र्य चळवळ देखावे यांसाठी प्रत्येक २५ गुण देण्यात येणार आहेत. यामध्ये राज्यातून सर्वाेत्कृष्ट ३ मंडळांची निवड केली जाणार असून त्यांना पारितोषिकेही देणार आहेत.

पारितोषिके अनुक्रमे ५ लाख, अडीच लाख आणि १ लाख रुपये इतकी देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त राज्यसमितीने उत्कृष्ट म्हणून निवड केलेल्या ४१ मंडळांना प्रत्येकी २५ सहस्र रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. याविषयी ४ जुलै या दिवशी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने शासन आदेश काढला असून त्यामध्ये स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.