रुग्‍णालयातही साधनेचे प्रयत्न करणारे आणि ‘गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना झाली नाही’, अशी खंत वाटणारे ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे (कै.) डॉ. रमेश पेंढारकर !

(कै.) डॉ. रमेश पेंढारकर

१. श्री. प्रसाद पेंढारकर (डॉ. रमेश पेंढारकर यांचा मुलगा), ठाणे

अ. ‘गेल्‍या काही दिवसांत रुग्‍णालयात असतांना बाबा नेहमी भ्रमणभाषमधील भगवान श्रीकृष्‍ण आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर आठवले यांचे चित्र डोक्‍याला लावून नमस्‍कार करायचे. ते त्‍यांच्‍या अनाहतचक्रावर हात ठेवून उपाय करायचे. गुरुदेवांना शरण जाऊन ‘त्‍यांनी प्रारब्‍धाचे हे भोग आनंदाने स्‍वीकारले होते’, असे मला जाणवले.

आ. ते सतत भजने ऐकत असायचे. त्‍यांची प्रकृती बरी नसल्‍याचे कळल्‍यावर संतांनी ‘त्‍यांची साधना चांगली चालू आहे’, असा निरोप पाठवला होता. तेव्‍हा त्‍यांच्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू आले होते. ‘गुरुमाऊलींची केवढी मोठी ही कृपा ! त्‍यांनी आपल्‍याला कसे घट्ट पकडून ठेवले आहे !’, असे बाबा म्‍हणाले. ‘गुरुमाऊली सगळे करून घेणार’, अशी त्‍यांची दृढ श्रद्धा होती.

इ. काही दिवसांपूर्वी त्‍यांच्‍या शरिरातील मिठाचे प्रमाण (सोडियम लेव्‍हल) न्‍यून झाल्‍यानंतर ते संदर्भहीन बोलू लागले होते. त्‍या वेळी ते विविध श्‍लोक म्‍हणायचे. ते नातेवाइकांना ओळखत नसत; परंतु प.पू. गुरुमाऊलींच्‍या छायाचित्राला मात्र ओळखायचे.

ई. ते रुग्‍णालयाच्‍या अतीदक्षता विभागात (आय.सी.यू.मध्‍ये) असतांना तेथेही चैतन्‍य जाणवत होते. तेथे गुरुमाऊलींचे अस्‍तित्‍व जाणवत होते.

उ. रुग्‍णालयातील प्रमुख आधुनिक वैद्य मनोज मस्‍के यांना त्‍यांनी अध्‍यात्‍माचे महत्त्व पटवून सांगितले आणि घरी दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक चालू करण्‍याविषयीही सांगितले.’

रमेश पेंढारकर यांनी स्‍वतःच्‍या मृत्‍यूची दिलेली पूर्वसूचना

‘मी बाबांजवळ गेल्‍यावर त्‍यांनी माझी नाडी तपासली आणि वरच्‍या दिशेला बोट केले. जणू काही ‘तेव्‍हा त्‍यांना गुरुमाऊलीचा पुढचा संदेश आला होता’, असे त्‍यांचे देहावसान झाल्‍यावर मला जाणवले.’

– श्री. प्रसाद पेंढारकर (डॉ. रमेश पेंढारकर यांचा मुलगा), कोलशेत, ठाणे.

२. श्री. मनोज कात्रे (भाचा, बहिणीचा मुलगा), पुणे

अ. ‘मामाला अतीदक्षता विभागात सतत गुरुदेवांची आठवण येत होती. त्‍याचा सतत नामजप चालू होता. ‘परात्‍पर गुरुदेव सर्वकाही आहेत’, असे तो वारंवार म्‍हणत होता. ‘गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना करता आली नाही’, याची त्‍याला पुष्‍कळ खंत वाटत होती. आम्‍ही गुरुदेवांना ओळखू शकलो नाही आणि मायेतील गोष्‍टींत अडकून बसलो’, असे तो म्‍हणत होता.

. मामा अत्‍यवस्‍थ असतांना त्‍याला आम्‍ही ‘निर्गुण’ हा नामजप करण्‍याची आठवण केल्‍यावर तो त्‍या स्‍थितीतही मान डोलवत होता.’

डॉ. रमेश पेंढारकर यांच्‍या मृत्‍यूनंतर जाणवलेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे

१. तोंडवळा प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍याप्रमाणे आनंदी दिसणे

अ. ‘बाबांंचे पार्थिव घरी (ठाणे येथे) आणल्‍यावर मला शांतता आणि स्‍थिरता जाणवत होती. त्‍यांचा चेहरा प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍याप्रमाणे आनंदी दिसत होता.’

– श्री. प्रसाद पेंढारकर, ठाणे. (२९.६.२०२३)

आ. ‘मामाला देवाज्ञा झाल्‍यानंतर त्‍याला अंघोळ घालून कपडे घालत असतांना मला त्‍याचा चेहरा प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍याप्रमाणे दिसला. तेव्‍हा मला प.पू. भक्‍तराज महाराज यांची पुष्‍कळ आठवण आली.’

– सौ. इंद्राणी कुलकर्णी (रमेश पेंढारकर यांची भाची), पुणे

२. घरात दाब न जाणवणे

अ. ‘त्‍यांचे पार्थिव घरी ठेवलेले असतांना ‘ते शांतपणे झोपले आहेत’, असे मला जाणवत होते. घरात कुठल्‍याही प्रकारचा दाब जाणवत नव्‍हता.’

– सौ. अनुराधा पेंढारकर (रमेश पेंढारकर यांची सून), ठाणे (२९.६.२०२३)

आ. ‘मामा गेल्‍यानंतर कुठेच दाब जाणवला नाही किंवा त्रास झाला नाही. घरातील वातावरणही शांत आणि चैतन्‍यदायी होते. घरी दत्ताचा नामजप लावला होता. ‘काही झालेच नाही’, असे वाटत होते.’

– श्री. मनोज कात्रे (रमेश पेंढारकर यांचा भाचा), पुणे

३. चेहर्‍यावर स्‍मितहास्‍य जाणवणे : ‘मामा शांत झोपला आहे’, असे जाणवत होते. त्‍याच्‍या तोंडवळ्‍यावर स्‍मितहास्‍य जाणवत होते.’

– सौ. इंद्राणी कुलकर्णी, पुणे

रमेश पेंढारकर यांच्‍या आध्‍यात्मिक प्रगतीविषयी जाणवलेली सूत्रे

१. ‘बांदा (पानवळ) येथील संत प.पू. दास महाराज यांच्‍याशी बोलल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘बाबांची भक्‍ती प.पू. गुरुमाऊलींच्‍या चरणी पोचली आहे आणि तू काहीही काळजी करू नकोस. ते जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून सुटले आहेत.’’

२. देवद आश्रमातील संत पू. गुरुनाथ दाभोलकरकाकांशी बोलल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘बाबांची पातळी ६० टक्‍के झाली आहे’, असा विचार सारखा मनात येत आहे’’ आणि ‘सर्व गुरुदेव करून घेतील’, याची ग्‍वाही दिली.

३. बाबांचे रुग्‍णाईत असतांनाचे प्रयत्न आणि गुरुमाऊलींप्रतीचा भाव पाहून अन् संतांचे त्‍यांच्‍याविषयीचे उद़्‍गार ऐकून ‘त्‍यांची आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के झाली असावी’, असे मलाही वाटते.’

– श्री. प्रसाद पेंढारकर (मुलगा), ठाणे.

४. ‘डॉ. पेंढारकर यांचे देहावसान ठाणे येथे झाले’, हे समजल्‍यावर आम्‍ही काही साधक सावंतवाडी येथील घरी त्‍यांच्‍या भावांना भेटायला गेलो होतो. त्‍या वेळी भ्रमणभाषवरून डॉ. पेंढारकर यांच्‍या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्‍या वेळी ‘ते शांत झोपलेले आहेत’, असे जाणवले. तेथे चैतन्‍य जाणवत होते. ‘ते जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त होऊन गुरुदेवांच्‍या चरणांजवळ पोचले आहेत’, असे मला वाटत होते. अशा गुणसंपन्‍न साधकांचा सत्‍संग मला दिल्‍याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. शंकर निकम (वय ६४ वर्षे), सावंतवाडी, सिंधुदुर्ग.

(सर्व सूत्रांचा दिनांक : २९.६.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक