सावंतवाडी येथील डॉ. रमेश दत्ताराम पेंढारकर (वय ७६ वर्षे) यांचे २५ जून २०२३ या दिवशी ठाणे येथे निधन झाले. ५ जुलै या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा अकरावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काढलेले कौतुकोद़्गार !पूर्वी मी विदेशातून आल्यावर गुरुमाऊलीला भेटायचो. त्या वेळी ते नेहमीच बाबांची विचारपूस करत आणि ‘त्यांची साधनेची तळमळ चांगली आहे. ते सतत आनंदी कसे रहातात ?’, हे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो’, असे म्हणत. बर्याच वेळा परात्पर गुरु डॉ. आठवले बाबांसाठी आणि घरच्यांसाठी प्रसादही पाठवत असत. – श्री. प्रसाद पेंढारकर (डॉ. रमेश पेंढारकर यांचा मुलगा), कोलशेत, ठाणे. (२९.६.२०२३) |
१. श्रीमती रश्मी पेंढारकर (डॉ. रमेश पेंढारकर यांच्या पत्नी, वय ७४ वर्षे), सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
१ अ. ‘यजमानांचा स्वभाव शांत होता. त्यांनी कधीच कुणाला दुखावले नाही. हसत-खेळत रहायला त्यांना आवडत असे.
१ आ. सतत कार्यरत असणे : त्यांनी कधीच अनावश्यक वेळ वाया घालवला नाही. अनावश्यक गप्पा-गोष्टी करणे, दूरचित्रवाणी संच बघणे इत्यादी गोष्टी ते करत नसत. घरातील आवश्यक असलेली कामे केल्यावर ते नामजप, सेवा, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन इत्यादी करत असत.
१ इ. पत्नीला नामजप आणि साधना करण्यास उद्युक्त करणे : आमच्या लग्नाला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ४५ वर्षांत यजमान देवाचे नामस्मरण, वाचन इत्यादी सर्व मनापासून करत असत. मी लग्नाच्या अगोदरपासूनच देवाची उपासना करत होते; परंतु यजमान मला सातत्याने ‘नामजप, उपासना कर’, असे सांगत असल्याने हळूहळू थोड्या प्रमाणात का असेना, माझीही सनातन संस्थेने सांगितल्याप्रमाणे साधना चालू झाली.
१ ई. पत्नीला आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे : मी मनातील सर्व गोष्टी यजमानांना मोकळेपणाने सांगत असे. माझ्या आईनंतर मला त्यांचा मोठा आधार होता. कधी कुणाची तक्रार वा कटू प्रसंग यजमानांना सांगितल्यास ते त्या प्रसंगात मला संबंधितांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शांत रहाण्यास सांगायचे. ते मला नामजप करण्याची आठवण करुन द्यायचे. ‘उलट बोलून समोरच्याला दुखवायचे नाही’, असे ते नेहमी सांगत.
१ उ. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्याने श्वास घेण्याचा त्रास न्यून होणे : पूर्वी त्यांना श्वास घेतांना त्रास होत असे. त्यांना दीर्घ श्वास घ्यावा लागत असे. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर त्यांचा हा त्रास लगेच न्यून झाला. ते पूर्ण श्रद्धेने साधना करत असत.’
२. श्री. प्रसाद पेंढारकर (डॉ. रमेश पेंढारकर यांचा मुलगा), कोलशेत, ठाणे.
२ अ. मुलांवर सुसंस्कार करणे
२ अ १. आयुर्वेदानुसार आचरण करण्याची शिकवण देणे : ‘बाबा आयुर्वेदीय वैद्य होते. ‘आयुर्वेदानुसार सात्त्विक रहाणीमान’, अशी त्यांची शिकवण असायची. मला आणि माझ्या भावंडांना त्यांनी लहानपणापासून ही शिकवण दिली आहे, उदा. थंड पाणी किंवा पेय न पिणे, पंखा जास्त न वापरणे इत्यादी. लहानपणापासून त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली आहे.
२ अ २. देवाची स्तोत्रे नियमित म्हणण्याची सवय लावणे : त्यांनी मला देवाची स्तोत्रे नियमित म्हणण्याची सवय लावली. त्याचे महत्त्व मला इयत्ता सातवी-आठवीपर्यंत कळले नव्हते. महत्त्व कळल्यानंतर मी स्तोत्रे नियमित म्हणण्याचा प्रयत्न करू लागलो.
२ आ. विविध सेवांमध्ये सहभागी होणे : वर्ष १९८९ मध्ये आम्ही सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे स्थायिक झालो. वर्ष १९९२ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अभ्यासवर्ग चालू झाले होते. गुरुमाऊलीला गाडीने सोडणे, त्यांच्या अभ्यासवर्गाची सिद्धता करणे, साधकांचे नियोजन करणे, प्रसार करणे इत्यादी सेवा त्यांनी केल्या आहेत. त्यांच्या या तळमळीने प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा), तसेच अनेक संत यांचे पदस्पर्श आमच्या मूळ घरी लागले आहेत. बाबांना त्यांची पाद्यपूजा करण्याची संधीही लाभली होती. आमच्या बाबांना प.पू. भक्तराज महाराज यांची भजने पुष्कळ आवडत असत आणि ते त्यात तल्लीन होत असत.
आरंभीच्या काळात प.पू. बाबांचे भंडारे, भजने यांमुळे बर्याच साधकांची वर्दळ असे. त्यामुळे घरातील काही जण ताण आल्यामुळे त्यांना बोलत असत; पण त्याचा त्यांनी कधीच विचार केला नाही आणि ते साधना करतच राहिले.
२ इ. मुलाला साधनेत साहाय्य करणे
१. मी वर्ष २००० मध्ये रासायनिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होतो. त्या वेळी माझ्या अडचणीच्या काळात मला ते नेहमी आधारस्तंभ वाटायचे. त्यांनी मला विविध संतांच्या माध्यमातून आत्मविश्वास दिला आणि साधना करण्याचे महत्त्व पटवून दिले. तेव्हापासून माझ्या साधनेला खर्या अर्थाने आरंभ झाला.
२. बाबा मला प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करायला सांगत असत. ‘ईश्वर त्याच्या भक्ताला कठीण प्रसंगातून कसे वाचवतो ?’, हे त्यांनी मला विविध प्रसंगांतून पटवून सांगितले.
३. मी पुढे विदेशात गेल्यावर नेहमीच त्यांनी मला ‘साधनेच्या प्रत्येक सूत्राकडे लक्ष देऊन ते कसे वाढवता येईल आणि कसे प्रयत्न करता येतील ?’, याविषयी मार्गदर्शन केले. ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवणे, सेवा वाढवणे’, ‘जो वेळ मिळेल तो सत्साठी कसा वापरता येईल ?’, याचे नियोजन करणे’ इत्यादी गोष्टींवर भर देण्याची सूचना त्यांच्याकडून मला नेहमीच मिळत असे. ते नेहमीच माझे साधनेचे मार्गदर्शक राहिले आहेत.
२ ई. प्रकृती बरी नसल्याने सेवा करता न येणे आणि त्या कालावधीत व्यष्टी साधना गांभीर्याने करणे : गेल्या काही वर्षांपासून प्रकृती बरी नसल्याने त्यांच्याकडून फारशा सेवा होत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी ‘मंत्रजप ऐकणे, नामजप करणे, दैनिक ‘सनातन प्रभात’मधील प्रत्येक वृत्त शिकण्याच्या दृष्टीकोनातून वाचणे, प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकणे’ इत्यादी गोष्टींवर भर दिला होता.
२ उ. प.पू. गुरुमाऊलीविषयी त्यांच्या मनात अपार भाव होता. ‘माझी पात्रता नसतांनाही त्यांनी मला जवळ केले आहे आणि अनेक जन्मांचे सार्थक केले आहे’, असे ते म्हणायचे.
मला गुरुमाऊलींनी असे सात्त्विक वडील दिल्याबद्दल त्यांच्या चरणी शब्दांत कृतज्ञता व्यक्त करणेही शक्य नाही. गुरुमाऊली, तुम्हीच माझ्याकडून वरील सूत्रे लिहून घेतल्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
३. सौ. अनुराधा पेंढारकर (डॉ. रमेश पेंढारकर यांची सून), ठाणे
अ. ‘माझे सासरे (डॉ. रमेश पेंढारकर) मला साधना करण्याची आठवण करून देत असत.
आ. प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये ते शांत असत आणि ‘सर्वकाही गुरुमाऊली बघून घेईल’, अशी त्यांची श्रद्धा असे. रुग्णाईत असल्यामुळे काही गोष्टी त्यांना स्वतःला करता येत नसत. ती परिस्थितीही त्यांनी शांतपणे स्वीकारली होती.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २९.६.२०२३)
डॉ. रमेश पेंढारकर यांनी वर्ष १९७१ ते १९७३ ही ३ वर्षे जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले होते. वर्ष १९७४ ते १९८९ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा आणि आरोंदा येथे खासगी दवाखाना चालू करून रुग्णसेवा केली आहे. वर्ष १९८९ ते १९९५ या कालावधीत त्यांनी माठेवाडा (तालुका सावंतवाडी) येथे रहात्या घरी रुग्णसेवा केली. रात्री-अपरात्री कधीही त्यांनी रुग्ण तपासणीसाठी दिरंगाई केली नाही. त्यामुळे ते जनमानसात लोकप्रिय होते. पेंढारकर कुटुंबीय माठेवाडा येथील श्री देव आत्मेश्वर मंदिराच्या स्थापनेच्या काळापासून तेथे सेवेत आहे. डॉ. पेंढारकरही पूजा-अर्चादी सेवा आतापर्यंत मनोभावे करत असत. एक सालस व्यक्तीमत्त्व आणि सनातनचे साधक म्हणून ते जनमानसात परिचित होते.
आंब्रड हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ ते ८ मासांहून अधिक काळ कुणीही डॉक्टर वैद्यकीय अधिकारी म्हणून टिकत नव्हते. अशा स्थितीत डॉ. पेंढारकर यांनी सलग ३ वर्षे सेवा केली. जेव्हा त्यांनी हे प्राथमिक आरोग्य केंद्र सोडले, तेव्हा तेथील लोक त्यांना सोडायला सिद्ध नव्हते. अनेकांनी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही खासगी दवाखाना चालवणार असाल, तर गावातच चालवा; मात्र गावातून जाऊ नका.’’ |