महाराष्‍ट्र शासन आणणार स्‍वकीय आणि सुलभ २२ सहस्र २५१ मराठी शब्‍दांचा नवीन शब्‍दकोश !

राज्‍यात मराठी भाषाशुद्धीच्‍या चळवळीला बळकटी मिळणार !

मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – महाराष्‍ट्र शासन स्‍वकीय आणि सुलभ असा २२ सहस्र ५२१ मराठी शब्‍दांचा नवीन शब्‍दकोश प्रकाशित करत आहे. शब्‍दकोशाचे काम शेवटच्‍या टप्‍प्‍यात आहे. लवकरच हा शब्‍दकोश प्रकाशित होण्‍याची शक्‍यता आहे. सर्व शासकीय विभाग, निमशासकीय कार्यालये, महामंडळे या सर्व ठिकाणी हा शब्‍दकोष लागू होणार आहे. यामुळे राज्‍यात मराठी भाषाशुद्धीच्‍या चळवळीला बळकटी मिळणार आहे.

या शब्‍दकोशामध्‍ये यापूर्वीच्‍या कठीण शब्‍दांऐवजी सोप्‍या शब्‍दांचा समावेश करण्‍यात आला आहे, तसेच परकीय शब्‍दांऐवजी मराठी शब्‍दांचा समावेश करण्‍यात आला आहे. यामध्‍ये शासकीय व्‍यवहारामध्‍ये ‘नस्‍ती’(फाईल) या शब्‍दाऐवजी ‘धारिका’ या मराठी शब्‍दांचा समावेश करण्‍यात आला आहे. यापूर्वी शासकीय कामकाजात उपयोग केल्‍या जाणार्‍या ‘इंजिनिअर’ या इंग्रजी शब्‍दाऐवजी ‘अभियंता’ आदी शब्‍दांचा समावेश करण्‍यात आला आहे. नव्‍याने येणार्‍या या मराठी भाषा शब्‍दकोशामध्‍ये यापूर्वीचे १५ सहस्र १०० शब्‍द आहेत. यामध्‍ये नवीन ७ सहस्र १५१ मराठी शब्‍दांचा समावेश करण्‍यात आला आहे. शासकीय ग्रंथालयाकडून या शब्‍दांची पडताळणी चालू आहे. या शब्‍दांना अंतिम मान्‍यता मिळाल्‍यानंतर या शब्‍दकोषाची छपाई करण्‍यात येणार आहे. राज्‍याच्‍या भाषा सल्लागार समितीद्वारे हे कामकाज पाहिले जात आहे. ‘अनेक मराठी शब्‍दांपैकी शब्‍दकोशासाठी कोणत्‍या शब्‍दाची निवड करावी, याविषयी भाषा सल्लागार समितीच्‍या सदस्‍यांमध्‍ये मतमतांतर असल्‍यामुळे मागील १ वर्षांपासून काम रखडले होते. शासकीय ग्रंथालयाची पडताळणी पूर्ण झाल्‍यानंतर हे काम यापुढे तरी लवकर होईल, असे वाटत आहे.

कामकाजात मराठी शब्‍दांचा उपयोग होण्‍याविषयी दक्ष रहावे लागणार !

राज्‍याच्‍या मराठी भाषा धोरणाच्‍या अंतर्गत शासकीय कामकाजामध्‍ये मराठी भाषेचा उपयोग करणे अनिवार्य आहे. प्रत्‍यक्षात मात्र नियमितच्‍या शासकीय लिखाणात अनेक परकीय शब्‍दांचा उपयोग केला जात आहे. सर्व शासकीय विभाग किंवा कार्यालये यांमध्‍ये मराठी भाषेचा उपयोग करण्‍यात यावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती करणे आवश्‍यक आहे.

संपादकीय भूमिका

शब्‍दकोश करण्‍यासमवेतच सर्वांनीच दैनंदिन व्‍यवहारामध्‍ये मराठी शब्‍दांचा वापर अधिकाधिक केला, तर मराठी भाषाशुद्धीची चळवळ जोर पकडेल !