१५ जुलैपर्यंत ५ सहस्र युवक थेट सरकारी विभागांमध्ये शिकाऊ (अप्रेंटिस) म्हणून सहभागी होतील ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १ जुलै (स.प.) – ‘नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (NAPS) पोर्टल’वर नोंदणीकृत ५ सहस्र युवकांना प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्त्वावर थेट सरकारी विभागांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून १५ जुलैपर्यंत सामील करून घेतले जाणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), हस्तकला, तंत्रविद्यानिकेतन (पॉलिटेक्निक) यांसारख्या विविध क्षेत्रांतर्गत युवक आणि महिला यांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य, पुनर्कुशलीकरण अन् उच्च कौशल्य (अपस्किलिंग) यांवर सरकार लक्ष केंद्रित करत आहे. असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण मित्र आणि तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशी ‘अप्रेंटिसशिप (शिकाऊ शिक्षण) आणि कौशल्य विकास’ या विषयावर ऑनलाईन संवाद साधतांना काढले.

आतापर्यंत केवळ १ सहस्र २०० युवकांनी नोंदणी केल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी डाटा नोंदी, लेखापाल, चालक, वाहक आदी रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मागील ८ दिवसांत सरकारने विविध सरकारी खात्यांशी मिळून १ सहस्र ९६ करार केले आहेत. ५० टक्के युवकांना ते ज्या खासगी आस्थापनात कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत, त्याच आस्थापनात १ वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळण्याची संधी आहे, अशी त्यांनी माहिती दिली.

जे शिकाऊ उमेदवार गेल्या १५ वर्षांपासून गोव्यात निवासाला आहेत, त्यांना भारत सरकारच्या कोणत्याही अप्रेंटिस योजनेंतर्गत देय असलेल्या मानधनापेक्षा प्रतिमास १ सहस्र ५०० रुपये मानधन अधिक दिले जाईल.  मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक पंचसदस्य, सरपंच आणि नगरसेवक यांचे युवकांची ‘नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (NAPS) पोर्टल’वर नोंदणी करून घेणे, हे ध्येय असले पाहिजे. या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवार म्हणून मिळणारा लाभ १ वर्षासाठी असेल. वर्षभरात ‘शिका आणि कमवा’ ही योजना कार्यवाहीत आणली जाईल.’’