मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात : २५ प्रवासी मृत्यूमुखी

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या कुटुंबियांना साहाय्य घोषित

मुंबई – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर एका खासगी बसला १ जुलैला पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली. अपघात झाला त्या वेळी बसमध्ये ३३ प्रवासी होते. त्यांपैकी २५ प्रवासी झोपेत असतांनाच मृत्यूमुखी पडले. इतर ८ प्रवाशांना अपघातातून स्वतःचे प्राण वाचवण्यात यश आले. या भीषण अपघाताविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि घायाळ झालेल्यांना प्रत्येकी ५० सहस्र रुपये देण्यात येणार आहेत, तर मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे साहाय्य देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेविषयी शोक व्यक्त केला असून घटना हृदयद्रावक असल्याचे म्हटले आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक आणि अग्नीशमन दल घटनास्थळी पोचले अन् त्यांनी साहाय्य कार्य चालू केले. घायाळ झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटवता आलेली नाही. याविषयी तज्ञांकडून अन्वेषण चालू आहे, तर घायाळ प्रवाशांवर बुलढाण्यातील रुग्णालयातच उपचार करण्यात येत आहेत.

बस नवीनच होती ! – ‘विदर्भ ट्रॅव्हल्स’चे मालक वीरेंद्र देर्ना

सदर बस ही ‘विदर्भ ट्रॅव्हल्स’ या खासगी प्रवासी वाहतूक आस्थापनाची होती. या आस्थापनाचे मालक वीरेंद्र देर्ना यांनी सांगितले की, ही बस नवीनच आहे. त्याची कागदपत्रेही अद्ययावत आहेत. त्याचा चालक दानिश हासुद्धा अनुभवी आहे.

गाडीचा टायर फुटून अपघात झाला ! – बसचालक दानिश

दानिशच्या म्हणण्यानुसार, गाडीचा टायर फुटून अपघात झाला. त्यानंतर आग लागून गाडीतील ज्वलनशील पदार्थांनी पेट घेतल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात दानिश वाचला आहे.

बुलढाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले की, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला आहे. पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावरून जातांना बस दुभाजकाला धडकली, त्यानंतर बसने पेट घेतला. बसमध्ये असणार्‍या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. बस उलटी झाल्याने बसचा दरवाजा खालच्या बाजूला आला त्यामुळे प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

समृद्धी महामार्गावर वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा बनवणार ! – मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घटनास्थळी भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली. यांनतर मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावर वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा बनवणार असल्याची घोषणा केली.

अपघातामागे घातपाताची शक्यता नाही ना, याची चौकशी करा ! – अजयसिंग सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

या बस अपघातामागे घातपाताची शक्यता नाही ना, याची चौकशी व्हायला हवी. कारण या बसमधून प्रवास करणारे सर्व जण हिंदूच होते. त्यामुळे हे हिंदूंचे सामूहिक हत्याकांड नाही ना ?, हेही पहायला हवे, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजयसिंग सेंगर यांनी केली आहे.