गोव्यात किनारपट्टी भागातील तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस

गोव्यात मुसळधार पाऊस : सरासरी ९० मि.मी. पावसाची नोंद

पणजी, ३० जून (वार्ता.) – गोव्यातील किनारपट्टीवरील तालुक्यांमध्ये ३० जून या दिवशी मुसळधार पाऊस पडला असून दिवसभरात सरासरी ९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २८ जूनच्या रात्री ८.३० वाजल्यापासून २९ जूनच्या रात्री ८.३० वाजेपर्यंत २४ घंटे सतत पाऊस पडत होता. त्यामुळे पाण्याची भासणारी कमतरता २८.३ टक्के भरून निघाली आहे. १ जून २०२३ पासून आतापर्यंत गोव्यात ६५५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

म्हापसा शहरात सर्वांत अधिक म्हणजे १४७ मि.मी. पाऊस पडला. त्यानंतर हवामान विभागाच्या मुरगाव आणि दाबोली येथील केंद्रांत अनुक्रमे १४१.८ मि.मी. अन् १४१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ घंट्यांत पणजी येथे ११८.६ मि.मी. पाऊस पडला. केपे येथे मात्र सर्वांत अल्प म्हणजे २० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बर्‍याच ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने काही घरे आणि वाहने यांची हानी झाली आहे. तांबडी माती, भाटले येथील टी.बी. रुग्णालयाजवळ एक आंब्याचे झाड उन्मळून जलवाहिनीवर पडल्याने जलवाहिनी फुटून तिची हानी झाली. याच ठिकाणी दत्तमंदिराजवळ असलेल्या एका घरावर माडाचे झाड कोसळले. सांताक्रूझ येथे घडलेल्या दुसर्‍या एका घटनेत झाडाची फांदी एका चारचाकी वाहनावर आणि विजेच्या तारांवर कोसळली.

 (सौजन्य : Prudent Media Goa)

पुढील २ आठवड्यांत गोव्यातअधिक प्रमाणात पाऊस पडणार

गोव्यात पुढील २ आठवड्यांत म्हणजे ३० जून ते ६ जुलै आणि ७ जुलै ते १३ जुलै या कालावधीत मोसमी वारे क्रियाशील रहाणार असून अधिक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या २ आठवड्यांत कमाल तापमान नेहमीपेक्षा अधिक रहाणार असून  किमान तापमानही नेहमीपेक्षा अधिक रहाणार आहे.