डॉ. प्रमोद सावंत भाजपच्या वतीने गोव्यातील सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत : सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्री रहाण्याचा मान !

पणजी, ३० जून (वार्ता.) – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजकारणात विक्रम करतांना भाजपच्या वतीने सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्री रहाण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना मागे टाकले आहे. स्व. मनोहर पर्रीकर एकूण ८ वर्षे गोव्याचे मुख्यमंत्री राहिले; परंतु त्यातील सर्वाधिक कालावधी ३ जून २००२ ते २ फेब्रुवारी २००५ हा ४ वर्षे १०१ दिवसांचा होता. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्याचे सलग मुख्यमंत्री रहाण्याला २९ जून या दिवशी ४ वर्षे १०२ दिवस पूर्ण झाले आहेत.

वर्ष २०१२ मध्ये पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गोव्यात सत्ता स्थापन केली होती; परंतु त्या वेळी पर्रीकर यांची केंद्रात आवश्यकता असल्याने त्यांना सुमारे अडीच वर्षांतच मुख्यमंत्रीपद सोडून देशाचे संरक्षणमंत्रीपद सांभाळावे लागले होते. डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्यापासून पंचायत, पालिका, महापालिका, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांत भाजपला यश मिळाले आहे.