सोलापूर, ३० जून (वार्ता.) – पुढे येणार्या भीषण आपत्काळात रुग्णांना होणार्या वेदना न्यून होण्यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचार शिकणे आवश्यक आहे. यासाठी सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर येथे ३ दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. या शिबिराचा सोलापूर जिल्ह्यातील ३४ शिबिरार्थींनी लाभ करून घेतला, तर ७४ जणांवर या शिबिराच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांचीही वंदनीय उपस्थिती होती.
शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक अवयवावरील वेदना न्यून होण्यासाठी हात आणि पाय यांवरील एकूण ३५ बिंदू कशा प्रकारे दाबावेत ?, नाभी सरकल्यानंतर ती जागेवर कशी आणावी ? नाभी सरकल्याची लक्षणे कोणती ? हेही शिकवण्यात आले, तसेच त्यावरील उपचारांचा सरावही शिबिरार्थींकडून करून घेण्यात आला. शिबिराच्या तिसर्या दिवशी विविध अवयवांना होणार्या वेदना न्यून होण्यासाठी आवश्यक ते सूक्ष्म व्यायामाचे प्रकारही शिकवण्यात आले.
शिबिरात उपचार घेतलेल्या साधकांच्या प्रतिक्रिया
१. सौ. पद्मावती व्हनमारे – मला वर्ष २००१ पासून पाठीमध्ये अत्यंत वेदना होत होत्या. अनेक वर्षे हा पाठदुखीचा त्रास कोणत्या कारणामुळे होत आहे, हे डॉक्टरांच्याही लक्षात येत नव्हते. त्यानंतर काही वर्षांनी समजले की ‘मानेच्या मणक्यांखालील गादी सरकली’ असल्याने वेदना होत होत्या. अनेक आधुनिक वैद्यांचे उपचार घेऊनही काहीच फरक पडला नाही. जिना चढउतार करतांना वेदनांमुळे पुष्कळ वेळ लागत होता. गुरुकृपेमुळे या शिबिराच्या माध्यमातून माझ्यावर उपचार झाल्याने मला होणार्या वेदना अत्यंत न्यून झाल्या आहेत. आता खाली बसतांना आणि उठतांना होणार्या वेदनाही पूर्णपणे थांबल्या आहेत.
२. सौ. शुभांगी पाटणे – १५ वर्षांपासून माझा उजवा हात पुष्कळ दुखत होता. त्यामुळे मी मागील ३ वर्षांपासून भाकरी बनवू शकले नाही. कणिक मळणे, कपडे धुणे अशी कामे मला करता येत नव्हती. या शिबिराच्या माध्यमातून उपचार केल्यानंतर मला होणारा त्रास ७० टक्के न्यून झाला आहे.
३. श्री. अनिल डहाळे – मागील ८ वर्षांपासून माझ्या गुडघ्याजवळची शीर दुखत असल्याने मांडी घालून अजिबात बसता येत नव्हते. शिबिरामध्ये डॉ. दीपक जोशी यांनी केलेल्या उपचारांमुळे शीर दुखण्याचे प्रमाण ९० टक्के उणावले आहे. त्यामुळे मी त्वरित मांडी घालून बसू शकलो.
४. सौ. मीना नकाते – मला मणक्यांचा त्रास असल्याने १० वर्षांपासून खाली मांडी घालून बसता येत नव्हते. शिबिरामध्ये माझ्यावर केलेल्या उपचारांमुळे मला त्याच दिवशी भोजन करण्यासाठी खाली बसता आले. उपचारानंतर माझे जखडलेले सर्व शरीर मोकळे झाले आहे.