श्री गुरूंनी मजसी नवविधा भक्‍तीस पात्र केले ।

३ जुलै २०२३ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्‍या निमित्ताने…

‘वयाच्‍या ४३ व्‍या वर्षांपर्यंत माझा अध्‍यात्‍म, साधना, सत्‍सेवा, भक्‍ती इत्‍यादींशी काहीही संबंध नव्‍हता. ‘मायाजाळात गुरफटलेल्‍या माझ्‍यासारख्‍या सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीकडून देवाची भक्‍ती होईल’, याची पुसटशी कल्‍पनाही मला नव्‍हती. तशातच ‘तैसी हरिभक्‍ति सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥’ (म्‍हणजे ‘भक्‍तीमार्ग हा सोपा वाटत असला, तरी तो सुळावरून चालण्‍याइतका कठीण आहे. त्‍यामुळे त्‍याची निवड करणाराही एखादा विरळाच असतो. तोच खर्‍या अर्थाने शूर म्‍हणायला हवा.’), या संत तुकाराम महाराज यांच्‍या अभंगानुसार ‘भक्‍ती करणे महाकठीण असून मला ते शक्‍य नाही’, असे मला वाटत होते. माझ्‍या चुकीच्‍या विचारांमुळे मी भक्‍तीपासून नेहमीच ४ हात दूर रहात होतो; मात्र परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाल्‍यावर माझे सनातन धर्माशी नाते जुळले आणि माझे भाग्‍य उजळले. परात्‍पर गुरु डॉक्‍टर ‘गुरुकृपायोग’ साधनामार्गाच्‍या माध्‍यमातून माझ्‍याकडून नवविधा भक्‍ती सहजपणे करून घेत आहेत. ते आम्‍हा साधकांमध्‍ये भक्‍तीचे नंदनवन फुलवत आहेत. त्‍यासाठी त्‍यांच्‍या चरणी पुढील कवितापुष्‍प अर्पण करतो.

पू. शिवाजी वटकर

सनातनशी नाते जुळले, भाग्‍य माझे उजळले ।
श्री गुरूंनी (टीप १) मजसी नवविधा भक्‍तीस पात्र केले ॥ १ ॥

परम पूज्‍यांनी (टीप २) सत्‍संगातून अध्‍यात्‍म शिकवले ।
श्री गुरूंनी मजसी ‘श्रवण’ भक्‍तीस पात्र केले ॥ २ ॥

परम पूज्‍यांनी मजसी धर्मप्रचार करण्‍यास लावले ।
श्री गुरूंनी मजसी ‘कीर्तन’ भक्‍तीस पात्र केले ॥ ३ ॥

परम पूज्‍यांनी नामस्‍मरण अन् गुरुस्‍मरण करूनी घेतले ।
श्री गुरूंनी मजसी ‘स्‍मरण’ भक्‍तीस पात्र केले ॥ ४ ॥

परम पूज्‍यांनी सत्‍सेवेचे व्रत माझ्‍या अंगी बाणवले ।
श्री गुरूंनी मजसी ‘पादसेवन’ भक्‍तीस पात्र केले ॥ ५ ॥

परम पूज्‍य कलियुगी महाविष्‍णूचा अवतार झाले ।
श्री गुरूंनी मजसी ‘अर्चन’ (पूजन) भक्‍तीस पात्र केले ॥ ६ ॥

परम पूज्‍य कलियुगी श्रीकृष्‍णावतारी हो झाले ।
श्री गुरूंनी मजसी ‘वंदन’ भक्‍तीस पात्र केले ॥ ७ ॥

परम पूज्‍य कलियुगी श्रीरामावतारी हो झाले ।
श्री गुरूंनी मजसी ‘दास्‍य’ भक्‍तीस पात्र केले ॥ ८ ॥

परम पूज्‍यांनी संकटकाळी माझे रक्षण केले ।
श्री गुरूंनी मजसी ‘सख्‍य’ भक्‍तीस पात्र केले ॥ ९ ॥

परम पूज्‍यांनी माझे सुख-दुःख आत्‍मीयतेने ऐकले ।
श्री गुरूंनी मजसी ‘आत्‍मनिवेदन’ भक्‍तीस पात्र केले ॥ १० ॥

परम पूज्‍यांनी ‘गुुरुकृपायोग’ मार्गानेे नवभक्‍तीस लावले ।
परम पूज्‍यांनी कृपा करूनी मजसी गुरुचरणी ठेविले ॥ ११ ॥

टीप १ आणि २ – परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी ठळक अक्षरांत लिहिलेली नवविधा भक्‍तीची नावे आहेत.’

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक