छत्रपती संभाजीनगर येथे आषाढी एकादशीच्‍या दिवशी रस्‍त्‍यावर मांसाचे तुकडे टाकले !

पोलिसांचा वेळीच हस्‍तक्षेप !

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – शहरातील मध्‍यवर्ती भाग असलेल्‍या गारखेडा परिसरात हेडगेवार रुग्‍णालयाच्‍या मागील बाजूस असलेल्‍या रस्‍त्‍यावर २९ जून या दिवशी सकाळी मांसाचे तुकडे पडलेले आढळून आले. आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्‍ही सण असल्‍याने हे तुकडे पहाताच महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या कार्यकर्त्‍यांनी पोलीस प्रशासनाला तात्‍काळ माहिती दिली. त्‍यानंतर पोलिसांनी तात्‍काळ हस्‍तक्षेप करत परिसरात शांतता राखण्‍याचे आवाहन केले, तसेच महानगरपालिकेच्‍या साहाय्‍याने रस्‍ता स्‍वच्‍छ करून घेतला.

सकाळी हेडगेवार रुग्‍णालयाच्‍या मागील रस्‍त्‍यावर मांसाचे तुकडे आढळल्‍याची बातमी परिसरात वार्‍यासारखी पसरली होती. पोलिसांनी परिसरात लावलेले सीसीटीव्‍ही चित्रण पडताळले. त्‍या वेळी एका भरलेल्‍या गाडीतून हे चुकून पडले असल्‍याचे लक्षात आले. महानगरपालिकेची कचरा उचलणारी गाडी बोलावून तात्‍काळ रस्‍त्‍याची स्‍वच्‍छता करण्‍यात आली. त्‍यानंतर रस्‍ता पाण्‍याने धुऊन स्‍वच्‍छ करण्‍यात आला. या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्‍यासह मनसेचे जिल्‍हाध्‍यक्ष सुमीत खांबेकर आणि कार्यकर्ते यांनी शांतता ठेवण्‍याचे काम केले.