नागपूर – सडकी सुपारी आयात केल्याप्रकरणी आरोपी वसीम बावला याला न्यायालयाने ३० जूनपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली आहे. आरोपीने शहरात म्यानमारसह ईशान्य आशियातील इतर देशांतून सीमाशुल्क आणि इतर कर चुकवून सडकी सुपारी आयात केली होती. अनेक व्यापारी करचुकवेगिरी करून म्यानमारमार्गे सडकी सुपारी आयात करतात. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि त्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी केली होती.
त्याच प्रकरणाच्या पुढील अन्वेषणात ‘ईडी’ने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नागपूर येथे धाड घातली होती, तेव्हा या संपूर्ण घोटाळ्यात वसीम बावला आणि त्याचे सहकारी असल्याचे ‘ईडी’च्या निदर्शनास आले होते. अनेक वेळा चौकशीसाठी बोलावूनही तो चौकशीत सहकार्य करत नव्हता. २२ जून या दिवशी ‘ईडी’ने त्याला अटक केली होती. राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यापासून सडक्या सुपारीची तस्करी वाढली आहे. बंदी असतांनाही शहरात खर्रा मिळतो. याकडे अन्न आणि औषध प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आरोग्यासाठी घातक असलेला खर्रा सडक्या सुपारीमुळे जीवघेणा ठरतो. तोंडासंबंधीचे अनेक आजार यामुळेच होतात. नागरिकांमध्ये ही याचे व्यसन वाढत आहे.
संपादकीय भूमिकाजनतेच्या आरोग्याला घातक असणारी सडकी सुपारी आयात करून विकणार्यांना त्वरित कठोर शिक्षाच हवी ! |