वारकर्‍यांची अनुपम विठ्ठलभक्ती !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयातील साधकांसमवेत श्री क्षेत्र पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि आध्यात्मिक संशोधनासाठी गेल्या होत्या. त्या वेळी वारीत चालत असलेल्या काही वारकर्‍यांचे मनोगत त्यांनी जाणून घेतले.

१. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वारीमधील एका वृद्ध वारकर्‍याला विचारले, ‘‘आजोबा, तुम्ही केव्हापासून वारी करत आहात ?’’ त्यावर तो वारकरी म्हणाला, ‘‘मी माझ्या आईच्या पोटात होतो, तेव्हापासूनच मी वारी करत आहे.’’

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

२. दुसर्‍या एका वारकर्‍याला विचारले, ‘‘काका, तुम्ही या उन्हातान्हात किती दिवस असेच चालणार ? सतत उन्हात चालत राहून तुम्ही काळे नाही का होणार ?’’ त्यावर ते वारकरी म्हणाले, ‘‘जोवर आम्ही आमच्या ईट्टलावानी काळं व्हत न्हायी, तोवर असेच चालत र्‍हानार.’’ म्हणजे ‘जोपर्यंत आम्ही आमच्या विठ्ठलासारखे पूर्ण काळे होत नाही, म्हणजेच त्याच्याशी पूर्णतः एकरूप होत नाही, तोपर्यंत आम्ही देवासाठी असेच चालत रहाणार.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ


संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाच्या माध्यमातून आलेल्या अकल्पित दैवी अनुभूतीतून अनुभवलेली ज्ञानेश्वर माऊलींची वात्सल्यमय प्रीती !

वारीमध्ये रिंगण झाल्यावर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मनात एका क्षणासाठी विचार आला, ‘आपल्यालाही माऊलींच्या या दैवी अश्वाचे दर्शन मिळावे’; पण नंतर त्या म्हणाल्या, ‘‘आपली प्रार्थना माऊलींच्या चरणापर्यंत देव नक्कीच पोचवेल.’’ असे बोलून त्या तेथून निघणार, तेवढ्यात त्यांना पाठीवर कशाचातरी स्पर्श जाणवला. त्यांनी मागे वळून पाहिले, तर रिंगणामधील ज्ञानेश्वर माऊलींचा अश्वच त्यांच्या मागे येऊन उभा होता आणि त्याने श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या पाठीवर मायेने त्याचे तोंड टेकवले होते, जणू ज्ञानेश्वर माऊलीच त्यांच्या पाठीवरून वात्सल्याने हात फिरवत होती.


हा चमत्कार पाहून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची पुष्कळ भावजागृती होणे आणि त्यांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या दैवी कार्यामुळे अशा अनुभूती येत असल्या’चे सांगणे

हा दैवी चमत्कार पाहून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची पुष्कळ भावजागृती झाली. ‘संत ज्ञानेश्वरांनीच आपली प्रार्थना ऐकून आपल्याला गुरुकार्यासाठी आशीर्वाद दिला आहे’, असे त्यांना वाटले. त्यांनी खाली वाकून माऊलींच्या अश्वाला भावपूर्ण नमस्कार केला. ‘पटांगणावर रिंगणासाठी सहस्रोेंच्या संख्येने वारकरी जमलेले असतांना या दैवी अश्वाने श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामागे नेमकेपणाने येऊन उभे रहाणे’, हा चमत्कारच नव्हे का ? या अश्वाच्या डोळ्यांत असलेले अत्यंत करुणामय भाव श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना अनुभवता आले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या दैवी कार्यामुळेच अशा दैवी अनुभूती अनुभवण्याचे भाग्य आपल्याला मिळते’, असे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले.

– महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाचे साधक

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक