श्री विठ्ठलाच्या उपासनेच्या अंतर्गत धर्मशास्त्रानुसार येणार्या कृती !
श्री विठ्ठलाच्या पूजेपूर्वी श्रीविष्णुतत्त्वाशी संबंधित सात्त्विक रांगोळ्या काढणे
श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचेच एक रूप आहे. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या पूजेपूर्वी, तसेच आषाढी किंवा कार्तिकी एकादशी आदी तिथींना घरी किंवा देवळात श्रीविष्णुतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्या सात्त्विक रांगोळ्या काढाव्यात. अशा रांगोळ्या काढल्यामुळे तेथील वातावरण विठ्ठलतत्त्वाने भारित होऊन त्याचा लाभ सर्वांना होतो. या रांगोळ्यांत पिवळा, फिकट निळा, गुलाबी आदी सात्त्विक रंग भरावेत.
(ईश्वरी कृपेमुळे सनातनच्या साधकांना सूक्ष्मातून मिळालेले दिव्य ज्ञान)
श्री विठ्ठलाला गोपीचंदन का लावतात आणि तुळस का वहातात ?
१. गोपीचंदन : ‘श्री विठ्ठलाला लावली जाणारी गोपीचंदनाची उटी तिच्यातील तारक गंधाने मूर्तीच्या पोकळीतील श्रीविष्णुरूपी अप्रकटत्वाला जागृत करून भक्तांना आध्यामिक उन्नतीच्या दिशेने नेणारी ठरते.
२. तुळस : तुळशीमध्ये श्रीविष्णूची सूक्ष्म स्पंदने (तत्त्व) आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचेच रूप आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला साहाय्य होते. त्यामुळे मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला मिळतो.
अ. तुळशीची काडी : तुळशीची काडी ही स्वयं श्रीकृष्णरूपी आपतत्त्वस्वरूप चेतना धारण करणारी आहे.
आ. तुळशीची मंजिरी : मंजिरी ही स्पर्शातून विष्णुतत्त्वाला जागृत करणारी आहे. तुळशीत श्रीकृष्णतत्त्व असल्याने मंजिरीतून उधळल्या जाणार्या चैतन्याच्या प्रवाहामुळे विठ्ठल मूर्तीतील श्रीकृष्णतत्त्व जागृत होते. भक्ताचा भाव वाढल्यावर त्याचे विष्णुतत्त्वात रूपांतर होऊन निर्गुणस्वरूप चैतन्य अनुभवता येते.
इ. मंजिरींचा हार : श्री विठ्ठलाच्या छातीवर रुळणारा तुळशीच्या मंजिरींचा हार हा मूर्तीतील मध्यभागातील स्थितीविषयक श्रीविष्णुरूपी क्रिया-शक्तीला चालना देणारा असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात.
ई. तुळशीची पाने : पाने स्थितीवाचक श्रीविष्णुतत्त्वाला सामावून घेऊन त्यांना प्रकट स्तरावर कार्य करण्यास भाग पाडणारी आहेत. ॐ
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |