मणीपूरमधील हिंसाचार करणार्‍यांकडून बंदी असलेल्या चिनी दुचाक्यांचा सर्रास वापर !

केनबो बाईक

इंफाळ (मणीपूर) – येथे चालू असलेल्या हिंसाचारात बंदी घातलेल्या चिनी बनावटीच्या ‘केनबो बाईक’ या दुचाकी गाड्यांचा सर्रास वापर केला जात आहे. उखरूल आणि कमजाँग या हिंसाचारग्रस्त डोंगराळ जिल्ह्यांत या गाड्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. देखभालीची विशेष आवश्यकता नसणारी ही दुचाकी अवघ्या २५ सहस्त्र रुपयांत मिळते. अन्य भारतीय दुचाकी गाड्यांच्या तुलनेत ती पुष्कळ स्वस्त आहे. मणीपूरमधील पहाडी भागांत या गाड्या चालवण्यास सुलभ आहेत; म्हणून त्यांचा हिंसाचार करणार्‍यांकडून वापर केला जात असल्याचे वृत्त आहे.

१. मणीपूरमधील हिंसाचारात पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेल्या दुचाकी गाड्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक ‘केनबो बाईक’ आहेत. विनाक्रमांकाच्या असलेल्या या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या, तरीही संबंधितांना विशेष हानी होत नाही.

२. पूर्वी या गाड्यांचा वापर अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी होत होता. त्यामुळे सरकारने या दुचाकीवर बंदी घातली होती.

३. चीनमधील युनान प्रांतातून दुचाकी गाडीचे सुटे भाग थायलंडहून म्यानमारमार्गे मणीपूरमध्ये विशिष्ट दलालांकडे पोचवले जातात. मणीपूरमध्येेच ते जोडले जातात.

संपादकीय भूमिका 

एका राज्यात बंदी घालण्यात आलेल्या गाडीचा सर्रास वापर होतो, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !