गुरुस्तवन पुष्पांजली
गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !
३. साधकांचे अवघे जीवन पालटणारी सद़्गुरुकृपा !
‘कां सरिता गंगेसी मिळाली ।
मिळणी होतां गंगा जली ।
मग जरी वेगळी केली ।
तरी होणार नाहीं सर्वथा ॥
परी ते सरिता मिळणीमागें ।
वाहाळ मानिजेत जगें ।
तैसा नव्हे शिष्य वेगें ।
स्वामीच होये ॥
– दासबोध, दशक १, समास ४, ओवी १३ आणि १४
अर्थ : नदी गंगेस मिळाली की, त्यासरशी गंगाच बनते. नंतर कितीही प्रयत्न केले, तरी ती गंगेपासून वेगळी केली जाऊ शकत नाही. एखादा ओहोळ नदीला मिळण्यापूर्वी जग त्याला ‘लहान ओढा’ म्हणते; पण नदीला मिळाल्यावर तो ओहोळ नदी होतो. याचप्रमाणे सामान्य साधक कसाही असला, तरी सद़्गुरुकृपा झाली की, तो तत्काळ गुरुच होतो.’
३ अ. अवतारी कार्याच्या प्रवाहात सामावून घेऊन साधकांना व्यापक बनवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या आगमनाने साधकांचे अवघे जीवनच पालटून गेले आहे. ‘सनातनशी जोडलेला साधक कसा आहे ?’, असा त्याच्या भूतकाळाचा विचार न करता श्री गुरूंनी त्याला प्रीतीने आपलेसे करून घेतले आहे आणि आपल्या अवतारी कार्याच्या प्रवाहात सामावून घेतले आहे. या कार्यप्रवाहात स्वतःला झोकून दिलेल्या साधकांमध्ये व्यापकता निर्माण करून गुरुदेव त्यांची आध्यात्मिक उन्नती करून घेत आहेत. त्यांच्यामध्ये उत्तम धर्मकार्य करण्याची क्षमताही निर्माण करत आहेत.
साधकांनो, या दिव्य गुरुलीलेची अनुभूती घेण्यासाठी अवतारी गुरूंच्या महासागररूपी कार्याच्या प्रवाहात स्वतःला झोकून देऊया. समर्पणामुळे लहानशा ओहोळालाही पवित्र गंगेचे स्वरूप प्राप्त होतेे. ओहोळाचा आदर्श ठेवून आपण आपला देह, मन, बुद्धी, चित्त आणि प्राण यांसहित संपूर्णपणे गुरुचरणी समर्पित होऊन पावन होऊया !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२६.६.२०२३)