नवी मुंबई, २६ जून (वार्ता.) – ए.पी.एम्.सी. फळ मार्केट येथील राजे शिवाजी उत्सव मंडळाच्या वतीने प्रतीवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय विद्यार्थ्यांना विनामूल्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे फळ मार्केटचे उपविभाग प्रमुख तथा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश म्हांगरे, बाबासाहेब नवले, संकेत तांबोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश म्हांगरे म्हणाले की, मंडळाच्या वतीने १४ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारणाचा हा भाग आहे. समाजातील गरजू, गरीब, होतकरू मुलांना वह्या आणि शाळेचे दप्तर यांचे वाटप करण्यात येते. या वर्षी ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे साहेब प्रतिष्ठान, भायखळा या अन्य एका आमच्या संघटनेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढून शिवरायांच्या विचारांचा प्रसार केला जातो.