वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात ‘हिंदु समाजाचे रक्षण’ या विषयावर मान्‍यवरांनी मांडलेले ओजस्‍वी विचार !

हिंदु संस्‍कृती संपवण्‍यासाठी आध्‍यात्मिक परंपरा नष्‍ट करणे आणि महिलांना भ्रष्‍ट करणे, ही षड्‍यंत्रे रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र हवे !

हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍यासाठी हिमालयाच्‍या उंचीचे धर्मकार्य करणे आवश्‍यक ! – पू. श्रीराम ज्ञानीदास महात्‍यागी, संस्‍थापक, तिरखेडी आश्रम, गोंदिया

पू. श्रीराम ज्ञानीदास महात्‍यागी

रामनाथी – देशाची प्रगती तर होत आहे; मात्र इंजिन बंद पडलेल्‍या विमानाप्रमाणे आपण भरकटलो आहोत. बौद्धिक क्षमता वाढली आहे; परंतु हृदय छोटे झाले आहे. भारतात ८० टक्‍के हिंदु आहेत; परंतु त्‍यांच्‍यातील किती हिंदूंमध्‍ये हिंदुत्‍व जिवंत आहे ? हिंदुत्‍व जिवंत असते, तर वर्ष १९४७ मध्‍येच भारत ‘हिंदु राष्‍ट्र’ झाला असता. केवळ ज्ञानाने हिंदु राष्‍ट्र येणार नाही, तर ईश्‍वराप्रती भाव आणि हिमालयाच्‍या उंचीचे धर्मकार्य करणे आवश्‍यक आहे. मार्गदर्शन करणारे सहस्रावधी आहेत; मात्र हिंदुत्‍वाचे कार्य करणारे मोजके आहेत. हिंदु समाज विविध पंथांमध्‍ये विभागला गेला आहे. हिंदु समाज ‘हिंदु’ म्‍हणून एकत्र येईल, तेव्‍हाच ‘रामराज्‍य’ येईल. आता संतांनी मठ आणि मंदिरे यांच्‍या कोषातून हिंदु धर्माच्‍या प्रचारासाठी बाहेर पडण्‍याची वेळ आली आहे. त्‍यांनी गावागावांमध्‍ये जाऊन मठ, मंदिरे यांच्‍या ठिकाणी धर्मशिक्षण देण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे तेजस्‍वी मार्गदर्शन गोंदिया येथील ‘तिरखेडी आश्रमा’चे संस्‍थापक पू. श्रीराम ज्ञानीदास महात्‍यागी यांनी काढले. ते वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात ‘हिंदु समाजाचे रक्षण’ या विषयावरील उद़्‍बोधन सत्रात मार्गदर्शन करत होते.

महानुभाव पंथाचा हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेत सक्रीय सहभाग राहील ! – पू. सुदर्शन महाराज कपाटे, अध्‍यक्ष, ग्‍लोबल महानुभाव संघ, छत्रपती संभाजीनगर

पू. सुदर्शन महाराज कपाटे

प्रत्‍येक जण आई, वडील, भाऊ, बहीण यांच्‍यावर प्रेम करायला शिकवतो; पण कुणीही आपल्‍या धर्मावर प्रेम करायला शिकवत नाही. त्‍यामुळे आपल्‍या मुलांना हिंदु धर्मशास्‍त्राची शिकवण दिल्‍याखेरीज हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होणार नाही. धर्मांध त्‍यांचे बांधव संकटात असतांना त्‍याच्‍या साहाय्‍यार्थ धावून जातात; मात्र हिंदू एका मुलीच्‍या देहाचे ३६ तुकडे होत असतांनाही तिला साहाय्‍य करत नाहीत. वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव संपल्‍यानंतर सर्व जण त्‍यांच्‍या घरी जातील; पण प्रत्‍येकाने या महोत्‍सवातील शिकवण आचरणात आणून प्रतिदिन काही घंटे धर्मासाठी देणे आवश्‍यक आहे. महानुभाव पंथ हा सनातन हिंदु धर्माचाच एक भाग आहे. त्‍यामुळे महानुभाव पंथाचा हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेत सक्रीय सहभाग राहील.

‘लव्‍ह जिहाद’ रोखण्‍यासाठी देशपातळीवर कठोर कायदा करणे आवश्‍यक ! – प.पू. यति माँ चेतनानंद सरस्‍वती, महंत, डासना पीठ, गाझियाबाद, उत्तरप्रदेश

प.पू. यति माँ चेतनानंद सरस्‍वती

हिंदु युवतींना ‘लव्‍ह जिहाद’ मध्‍ये षड्‍यंत्राप्रमाणे फसवले जात आहे. एखाद्या युवतीच्‍या मृत्‍यूनंतरही तिच्‍या मृतदेहावर बलात्‍कार करणे हे पशूलाही लाजवणारे कृत्‍य आहे. असे प्रकार जिहाद्यांकडून चालू आहेत. त्‍यामुळे ‘लव्‍ह जिहाद’ रोखण्‍यासाठी जिहाद्यांच्‍या मनात भय निर्माण होईल, असा कायदा केंद्रीय स्‍तरावर करणे आवश्‍यक आहे. भारतीय संस्‍कृती संपवण्‍यासाठी ‘लव्‍ह जिहाद’चे षड्‍यंत्र चालू आहे. त्‍यामुळे ‘लव्‍ह जिहाद’ हा संघटित गुन्‍हा मानला पाहिजे. ‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटातून हे सत्‍य बाहेर आले आहे. आतापर्यंत ‘लव्‍ह जिहाद’ गुप्‍तपणे चालू होता; परंतु देहली येथील युवती साक्षी मलिक हिची क्रूर हत्‍या पहाता हे प्रकार आता उघडपणे चालू करण्‍यात आले आहेत. हिंदु संस्‍कृती संपवण्‍यासाठी आध्‍यात्मिक परंपरा नष्‍ट करणे आणि महिलांना भ्रष्‍ट करणे, ही षड्‍यंत्रे चालू आहेत.

धर्मांतर रोखण्‍यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्‍यक ! –  पू. भागीरथी महाराज, संस्‍थापक, श्री गुरुकृपा सेवा संस्‍थान, नागपूर

पू. भागीरथी महाराज

कोरोना महामारीच्‍या काळात विदर्भामध्‍ये धर्मांतर रोखण्‍यासाठी आम्‍ही कार्य केले. धर्मांतर रोखण्‍याचे कार्य करत असतांना सातत्‍याने विरोध होत आहे. आसुरी शक्‍तींनी मारुतिरायांनाही ईश्‍वरी कार्य करत असतांना रोखण्‍याचे काम केले. त्‍याप्रमाणे धर्मकार्य करतांना विरोध होणारच आहे. बीज ज्‍याप्रमाणे स्‍वत: नष्‍ट होऊन वृक्ष निर्माण करते, त्‍याप्रमाणे धर्मकार्यासाठी आपण सर्मपित होऊन कार्यरत रहायला हवे. क्रांतीकारकांनी राष्‍ट्रासाठी फाशी स्‍वीकारली, तर आपणही झोकून देऊन धर्मकार्य करायला हवे. लोकमान्‍य टिळक यांनी हिंदूंना एकत्र आणण्‍यासाठी गणेशोत्‍सव चालू केला; परंतु सद्यःस्‍थितीत भगवंताला विसरून मंदिरामंदिरांमध्‍ये वाद चालू आहेत. वाद करण्‍याऐवजी मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे आवश्‍यक आहे. धर्मांतर रोखण्‍यासाठी हिंदूंना हिंदु धर्माचे शिक्षण देणे आवश्‍यक आहे.

हिंदु धर्माचे पुनरुज्‍जीवन करण्‍याच्‍या कार्यात प्रसारमाध्‍यमांची भूमिका मोठी ! – जयकृष्‍णन् जी., निवेदक, पी. गुरुज् वाहिनी, चेन्‍नई

श्री. जयकृष्‍णन् जी.

सध्‍या आपण हिंदु धर्माच्‍या पुनरुज्‍जीवनाच्‍या उंबरठ्यावर आहोत. प्रसारमाध्‍यमे हिंदु धर्माच्‍या पुनरुज्‍जीवनात पुष्‍कळ मोठी भूमिका बजावत आहेत. हिंदु धर्माच्‍या रक्षणासाठी सामाजिक माध्‍यमे, मुद्रित प्रसारमाध्‍यमे आणि इलेक्‍ट्रॉनिक प्रसारमाध्‍यमे यांचे पुष्‍कळ मोठे योगदान अपेक्षित आहे. सनातन संस्‍थेने काळाची आवश्‍यकता ओळखून गोव्‍यात पुष्‍कळ मोठा प्रसारण स्‍टुडिओ (चित्रीकरण कक्ष) उभारला आहे. सनातनने आध्‍यात्मिक साधनेमध्‍ये कुलदेवतेच्‍या नामजपावर भर दिला आहे. अलीकडच्‍या काळात या विषयावर ‘कांतारा’ आणि ‘मल्लिकापूरम्’ यांसारखे चित्रपटही काढण्‍यात आले आहेत. आज बरेच जण आक्रमणाच्‍या भीतीमुळे अल्‍पसंख्‍यांकांच्‍या धर्माविषयी बोलत नाहीत; मात्र सध्‍या हिंदु धर्माचे कार्य निर्भीडपणे पुढे नेण्‍याची वेळ आली आहे.