१. संथ लयीत आणि श्वासासह नामजप चालू झाल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टर नामजप करायला का सांगतात ?’, याविषयी चिंतन होणे
‘आज सकाळी नामजप करत असतांना नामजप एका संथ लयीत आणि एकाग्रतेने होत होता. त्या वेळी दीर्घ श्वसन होत होते. तेव्हा ‘गुरुकृपेने नाम श्वासासह जोडले गेले आहे’, हे माझ्या लक्षात आले. ‘आपण श्वासामुळे जगतो, नामामुळे नाही’, या परात्पर गुरु डॉक्टरांच्या ब्रह्मवाक्याचे स्मरण झाले आणि तरीही ‘गुरुदेव नामजप करायला का सांगतात ?’, यावर माझे चिंतन चालू झाले.
२. कामाच्या धावपळीत दम लागून श्वासोच्छ्वास वेगाने होणे आणि विश्रांती घेतल्यामुळे श्वासाची गती संथ होणे
एरव्ही घरातील कामे करतांना व्यक्तीला दम लागतो आणि तिचा श्वासोच्छ्वास वेगाने होऊ लागतो. त्यामुळे अधिक श्वास खर्च होतात. त्या वेळी व्यक्ती थोडा वेळ एका ठिकाणी शांतपणे बसते आणि वाढलेल्या श्वासाची गती संथ झाल्यावर पुन्हा काम करू लागते. अशा रितीने कामाच्या धावपळीत अधिक व्यय झालेले श्वास आपण विश्रांती घेऊन संतुलित करण्याचा प्रयत्न करतो.
३. श्वासामुळे मनुष्य जिवंत रहात असला, तरी नामजप केल्याने त्याच्या श्वासोच्छ्वासाची गती न्यून होऊन तो दीर्घायुषी होत असणे
नामजपामुळे वेगाने होणार्या श्वासोच्छ्वासाची संख्या न्यून करणे सहज साध्य होते. ‘व्यक्ती जन्माला येतांनाच ‘ती पृथ्वीतलावर किती श्वास घेणार, हे ठरलेले असते’, असे म्हणतात. नामस्मरण करतांना आपण श्वास अधिक साठवून ठेवतो. नामामुळे शिल्लक असलेल्या श्वासोच्छ्वासाची संख्या वाढते. श्वासामुळे आपण जिवंत रहात असलो, तरी नामजप केल्याने आपल्या श्वासोच्छ्वासाची गती नेहमीपेक्षा न्यून झाल्याने शिल्लक राहिलेले श्वास पूर्ण करण्याचा कालावधी वाढतो. त्यामुळे आपण दीर्घायुषी होतो. यासाठी नामस्मरण करायला हवे. यातून ‘सतत ध्यानमग्न असणारे ऋषीमुनी दीर्घायुषी का होते ?’, हेही लक्षात येतेे.
परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून वरील चिंतन करून घेतले. त्यामुळे माझी नामावरील श्रद्धा आणखी दृढ झाली. यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, कोल्हापूर. (१.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |