औरंगजेब हा या देशाचा आदर्श कधीच होऊ शकत नाही !
नागपूर – अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उभारणीत देशभरातील अनुमाने ५ लाख ३४ सहस्र गावांचे योगदान आहे. साहजिकच या गावांसह संपूर्ण देशवासियांची जानेवारी २०२४ मध्ये आयोजित प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित रहाण्याची इच्छा आहे; पण अयोध्येत एकाच वेळी इतक्या लोकांची व्यवस्था करणे शक्य नसल्याने गावखेडी, तसेच शहर आणि महानगर यांसह प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार चालू आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्री. मिलिंद परांडे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, जानेवारीमध्ये अयोध्या येथे प्रचंड थंडी असते. अनेकांना ही थंडी सहन होणारी नसते. कडाक्याच्या थंडीत किती लोकांचा बंदोबस्त करता येईल, यावरही विश्व हिंदु परिषद विचार करत आहे. काही गोष्टी देशभर होतील, काही कार्यक्रम अयोध्या येथे होतील. दर्शनाचा क्रम काय असू शकतो ? याचा विचार न्यास आणि विश्व हिंदु परिषदही करील. प्रत्येकालाच प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याचा आनंद मिळावा यासाठी हा कार्यक्रम संपूर्ण भारतात कसा करता येईल, याची आखणी करण्यात विहिंप गुंतली आहे.
औरंगजेब हा या देशाचा आदर्श कधीच होऊ शकत नाही !
श्री. मिलिंद परांडे म्हणाले की, औरंगजेब हा या देशाचा आदर्श कधीच होऊ शकत नाही. त्याचा डीपी लावणे, त्याचा प्रचार करणे आणि त्याला महापुरुष म्हणणे, या गोष्टी अत्यंत मूर्खपणाच्या आहेत. हे धर्मांधतेचे लक्षण आहे. औरंगजेबाचे जीवन अत्याचार आणि क्रूरतेने भरलेले आहे. त्याची कबर महाराष्ट्रातच खोदली गेली आहे. जे अफझलखानाच्या कबरीचे झाले, तीच अवस्था औरंगजेबाच्या कबरीची व्हावी. त्याला आदर्श मानून मुसलमान समाजातील काही घटक एक राजकीय आकांक्षा बाळगून आहेत. टिपू सुलतान आणि औरंगजेब यांचे नाव पुढे करत मुसलमानांचा एक वर्ग भारतात राजकीय वर्चस्वाची स्वप्ने पहात आहे. मुसलमानांनी झोपेतून जागे व्हावे, त्यांची स्वप्ने कधीच पूर्ण होणार नाहीत. केंद्र आणि राज्य येथे हिंदु हिताचा विचार करणारे लोक बसले आहे. विश्व हिंदु परिषद त्यांचे समर्थन करील. |