इंदापूर (पुणे) येथे संत तुकाराम महाराजांच्‍या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा रंगला !

इंदापूर (जिल्‍हा पुणे) – टाळ-मृदंगाच्‍या गजरात, विठुरायाचा जयघोषात बाभूळकरांचा मानाचा देवाचा अश्‍व आणि स्‍वाराचा मोहिते-पाटील यांच्‍या अश्‍वाने वायूवेगाने दौड करत ५ फेर्‍या पूर्ण करत रिंगण पार केले. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्‍यातील दुसरे रिंगण इंदापूरमधील कस्‍तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्‍या प्रांगणामध्‍ये पार पडले. इंदापूरमध्‍ये सकाळी ११ वाजता नगारखाना पोचला. त्‍यापाठोपाठ २७ दिंड्या, संत तुकाराम महाजांची पालखी, ५० हून अधिक दिंड्या रिंगण प्रांगणामध्‍ये पोचल्‍या. मध्‍यभागी पालखी ठेवली होती. प्रांगणाच्‍या उजव्‍या बाजूने प्रदक्षिणा घालण्‍यास प्रारंभ झाला. विणेकर्‍यांचे १२ वाजता रिंगण पार पडले. त्‍यांनी प्रत्‍येकी ३ प्रदक्षिणा घातल्‍या. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा जयघोष अखंड चालू होता. पालखीसमोर उडीचा खेळ रंगला. या वेळी वारकर्‍यांचे पदाधिकारी, विश्‍वस्‍त आणि राजकीय मंडळी उपस्‍थित होती.