हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेचे कार्य ईश्‍वराच्‍या अधिष्‍ठानानेच (साधनेनेच) होऊ शकणार असणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’मध्‍ये सहभागी झालेल्‍या ज्‍या वक्‍तांनी नित्‍यनियमाने साधना करून आध्‍यात्मिक उन्‍नती केली आहे, अशांच्‍या तोंडूनच भाषणामध्‍ये पदोपदी कृतज्ञताभाव व्‍यक्‍त होतो. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेनेच मी हे कार्य करत आहे’, असे ते म्‍हणत असतात. तसेच ‘सातत्‍याने नामस्‍मरण केल्‍यानेच आलेल्‍या विविध संकटांवर मी मात करू शकतो’, असेही त्‍यांचे म्‍हणणे असते. अशा वक्‍त्‍यांचे भाषण ऐकावेसे वाटते. त्‍यांच्‍या भाषणात चैतन्‍य जाणवते, तसेच चेहर्‍यावर आनंद जाणवतो. अशा वक्‍त्‍यांचेच हिंदुत्‍वासाठीचे कार्य परिणामकारक होतांना लक्षात येते.

याउलट काही वक्‍ते ‘मी अमुक करतो, तमुक करतो’, असे म्‍हणत असतात; पण साधना करत नाहीत. त्‍यांचा असाही प्रश्‍न असतो, ‘हिंदुत्‍वासाठीच्‍या कार्यात साधनेचे महत्त्व काय ? साधनेने काय होणार ?’ अशांना कळत नाही की, साधना हा मानवाचा प्राण आहे. मानवजन्‍माचा उद्देश ‘साधना करून ईश्‍वरप्राप्‍ती करणे’ हाच आहे. ईश्‍वरच आपल्‍याकडून हे कार्य करवून घेऊ शकतो. त्‍यासाठी ईश्‍वराचे अधिष्‍ठान (साधना) हवे !’

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (१९.६.२०२३)


‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’मध्‍ये आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करतांना स्‍वतःमध्‍ये झालेला पालट !

‘गेल्‍या वर्षी झालेल्‍या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’मध्‍ये मी आध्‍यात्मिक उपाय आवश्‍यक असल्‍यास ते करण्‍यासाठी जायचो. तेव्‍हा माझ्‍या मनामध्‍ये ‘ते माझे कर्तव्‍य आहे’, हा भाव ती सेवा करतांना असायचा. खरेतर तो माझा सूक्ष्म स्‍तरावर कर्तेपणाच होता; पण यावर्षी होत असलेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’मध्‍ये, म्‍हणजेच ‘एकादश अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’मध्‍ये मात्र माझ्‍या मनामध्‍ये ‘मी हे आध्‍यात्मिक उपाय करणार नसून गुरुच माझ्‍या माध्‍यमातून ते करणार आहेत आणि मी त्‍यांच्‍या चरणी शरणागत आहे’, असा भाव निर्माण झाला आहे. ही माझ्‍यावरील गुरुकृपाच आहे !’

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (१६.६.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक