अमरावती येथे विवाहितेचे लैंगिक शोषण करून फेसबुकवरून ३५ तुकडे करण्‍याची धमकी !

प्रतिकात्मक चित्र

अमरावती – लग्‍न करण्‍याचे आमीष दाखवून एका विवाहित तरुणीचे अनेकदा लैंगिक शोषण करणार्‍या आरोपीचे खरे स्‍वरूप कळल्‍याने त्‍याला तिने नकार दिला; मात्र तिची खासगी छायाचित्रे समाजमाध्‍यमांवर प्रसारित करून तिचे ३५ तुकडे करण्‍याची धमकी त्‍याने फेसबुकवरून दिली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्‍हा नोंद केला आहे. (वासनांधांच्‍या विळख्‍यात सापडून आयुष्‍याची हेळसांड होऊ नये; म्‍हणून तरुणींनी सावध रहावे ! – संपादक)

पीडितेचे पतीविरोधात कौटुंबिक छळाचे प्रकरण न्‍यायप्रविष्‍ट आहे. त्‍यातच मयूर नावाच्‍या युवकासमवेत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्‍या कालावधीत मयूरने पीडितेचे लैंगिक शोषण केले. पीडितेने लग्‍नाची वारंवार मागणी केल्‍याने दोघांत वाद होऊन बोलणे बंद झाले; मात्र नंतर मयूरने फेसबुकवरून ‘रियान शर्मा’ या खोट्या नावाद्वारे तिच्‍याशी संवाद साधला; पण तो मयूर असल्‍याचे तिला समजल्‍याने तिने बोलण्‍यास नकार दिला. पीडितेने ‘त्‍याच्‍या घरी याची वाच्‍यता करू’, असे सांगितले होते. त्‍यामुळे आरोपीने वरील कृत्‍य केले.