शिकण्‍याची वृत्ती असलेल्‍या आणि परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारणार्‍या मुंबई येथील सौ. धनश्री प्रदीप केळशीकर !

मुंबई येथील सौ. धनश्री केळशीकर यांच्‍याविषयी त्‍यांची मुलगी कु. म्रिण्‍मयी केळशीकर हिला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. धनश्री केळशीकर

१. ‘नोकरीनिमित्त वडिलांचे स्‍थलांतर होणार आहे’, असा निरोप मिळाल्‍यावर ताण येणे

कु. म्रिण्‍मयी केळशीकर

‘माझ्‍या वडिलांची सरकारी नोकरी असल्‍यामुळे प्रती २ वर्षांनी त्‍यांचे वेगवेगळ्‍या राज्‍यांत स्‍थलांतर होते. ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये माझ्‍या आईने मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘बाबांच्‍या नोकरीचे स्‍थलांतर भाग्‍यनगरला होणार आहे. आपल्‍यालाही त्‍यांच्‍या समवेत जायचे आहे. त्‍यासाठी आपल्‍याला स्‍थलांतराची सिद्धता करावी लागेल.’’ हे ऐकून मला ते स्‍वीकारता आले नाही आणि मला त्‍याचा पुष्‍कळ ताणही आला. ‘मी आता गोवा येथे आहे. स्‍थलांतरासाठी मला पुन्‍हा मुंबईला जावे लागेल. ‘भाग्‍यनगर एकदम अनोळखी जागा आहे. तेथे रहायला आई, बाबा (श्री. प्रदीप केळशीकर), दादा (श्री. ऋत्‍विज केळशीकर) आणि मला जमणार का ?’, असे नकारात्‍मक विचार येऊन मला ताण आला.

२. आईने परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारून भाग्‍यनगरमध्‍ये प्रसारसेवेचे नियोजन करणे आणि हे ऐकून मन स्‍थलांतरासाठी सिद्ध होणे

काही दिवसांनी मी परत आईला भ्रमणभाष करून माझ्‍या मनात येणारे नकारात्‍मक विचार सांगितले. तेव्‍हा मी म्‍हणाले, ‘‘मी इथे असूनही मला स्‍थलांतराचा ताण आला. तू तर मुंबईत आहेस. तुला पुष्‍कळ ताण आला असेल ना ?’’ तेव्‍हा ती मला म्‍हणाली, ‘‘गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) जेथे मला पाठवतील, ती माझी गुरुभूमी आणि कर्मभूमी आहे. मला तिथे जाऊन गुरुसेवाच करायची आहे. ‘भाग्‍यनगरला जाऊन माझे कसे होईल ?’, असा विचार न येता मला आनंद आणि उत्‍साह वाटत आहे. मी आतापासूनच ‘तिथे प्रसार कसा करायचा ?’, याचे नियोजनही करून ठेवले आहे.’’ तेव्‍हा ‘आई सतत गुरुसेवेचा विचार करत असल्‍यामुळे तिने परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारून सेवेचे नियोजनही करून ठेवले होते’, असे माझ्‍या लक्षात आले. हे ऐकून मी सकारात्‍मक झाले आणि माझे मनही स्‍थलांतरासाठी सिद्ध झाले.

३. भाग्‍यनगरची तेलुगु भाषा शिकण्‍याची वृत्ती

कुठल्‍याही राज्‍यात गुरुकार्याचा प्रसार लवकरात लवकर होण्‍यासाठी त्‍या राज्‍यातील प्रचलित भाषा ठाऊक असणे आवश्‍यक असते; म्‍हणून आईने भाग्‍यनगर येथील प्रचलित भाषा तेलुगु शिकण्‍याचा निर्णय घेतला. तसेच आईने प्रसारासाठी तेलुगु भाषेतील हस्‍तलिखित प्रत (script) मराठीमध्‍ये बनवून ठेवली. तसेच इंग्रजी आणि हिंदी या भाषांमध्‍येही प्रत बनवायचे ठरवले. तेथील प्रसारसेवा करणार्‍या साधकांशी संपर्क करून त्‍यांच्‍या समवेत सेवेचे नियोजन करण्‍याचे ठरवले.

‘हे गुरुदेवा (परात्‍पर गुरु डॉ. आठवले), तुमच्‍या अपार कृपेमुळे मला अशी आई मिळाली. त्‍याबद्दल तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– कु. म्रिण्‍मयी प्रदीप केळशीकर, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा. (२६.५.२०२३)


सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांना भेटणे अन् त्‍यानंतर ३ दिवसांनी वडिलांच्‍या नोकरीचे स्‍थलांतर रहित होणे

सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर
पू. (सौ.) संगीता जाधव

सेवेनिमित्त आईने सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची भेट घेतली. आईने त्‍यांना सांगितले, ‘‘माझ्‍या यजमानांचे स्‍थलांतर झाले असून १ – २ मासांनी आम्‍ही भाग्‍यनगरला जाऊ.’’ तेव्‍हा सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव आईला म्‍हणाल्‍या, ‘‘तुम्‍ही आम्‍हाला सोडून कुठे चाललात ?’’ तेव्‍हा आईला काही बोलता आले नाही. त्‍यांची भेट झाल्‍यावर ३ दिवसांनी माझ्‍या वडिलांना त्‍यांचे स्‍थलांतर रहित झाल्‍याचा निरोप मिळाला. हे कळल्‍यावर आमची पुष्‍कळ भावजागृती होऊन सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

– कु. म्रिण्‍मयी प्रदीप केळशीकर, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा. (२६.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक