सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’च्‍या संदर्भात वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्‍याणकर यांना आलेल्‍या अनुभूती !

१. ब्रह्मोत्‍सव सोहळ्‍यात प्रत्‍यक्ष सहभागी होण्‍याविषयी समजल्‍यावर मनात आलेले विविध विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अ. ‘जेव्‍हा मला समजले की, मी ११ मे या दिवशी होणार्‍या ब्रह्मोत्‍सवात प्रत्‍यक्ष सहभागी होऊ शकते, तेव्‍हा मला श्री गुरूंच्‍या चरणी आणि त्‍यांचेच समष्‍टी रूप असलेल्‍या सर्व आयोजक साधकांच्‍या प्रती पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.

आ. ‘या सोहळ्‍यासाठी मी कधी एकदा पोचते ?’, अशी माझी स्‍थिती झाली होती. मी या सोहळ्‍यासाठी पुष्‍कळ उत्‍सुक होते आणि ते अमूल्‍य ऐतिहासिक क्षण अनुभवण्‍यासाठी त्‍या दिवसाची आतुरतेने वाट पहात होते.

इ. प.पू. भक्‍तराज महाराज यांचे सुवचन आहे, ‘इंतजार में जो मजा है, वो मिलने में नहीं !’ सोहळ्‍यात सहभागी होण्‍यापूर्वी या सुवचनाची मी प्रत्‍यक्ष अनुभूती घेत होते. ‘आई-बाबांसह आपल्‍या तिन्‍ही गुरूंचे (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) प्रत्‍यक्ष दर्शन होणार’, या विचारानेच माझे मन आनंदी आणि उत्‍साही होत होते.

ई. ‘सोहळा म्‍हणजे नेमके काय असणार ?’, हे मला ठाऊक नव्‍हते; पण मला वाटत होते, ‘साक्षात् हिंदु राष्‍ट्रच अवतरणार आहे. श्रीरामरूपी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रामराज्‍याची स्‍थापना करणार आहेत. त्‍यांच्‍या भव्‍य दरबारामध्‍ये आम्‍हा सर्व साधकांकडून त्‍यांचा जयजयकार होणार आहे’ आणि आश्‍चर्य म्‍हणजे प्रत्‍यक्षात मैदानात तसेच झाले ! त्‍यामुळे ‘देवाने ही पूर्वसूचना दिली’, असे मला वाटले.

२. सोहळा पहातांना

वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर

अ. श्री गुरूंचा भव्‍य दिव्‍य सोहळा माझ्‍या आई-बाबांसह ‘याची डोळा याची देही’ पहाण्‍याची संधी मिळाली; म्‍हणून मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटत होती. त्‍यासह ‘सर्व साधकांसह गुरुमाऊलींचे दर्शन होणे किती दुर्लभ आहे !’, याची जाणीव होऊन मी या सुवर्णक्षणांची साक्षीदार असल्‍याने स्‍वतःला पुष्‍कळ भाग्‍यवान समजत होते.

आ. ‘हा ब्रह्मोत्‍सव संपूच नये’, असे मला वाटत होते. हे सर्व इतके छान होते की, ‘देहभान, मन, बुद्धी, एकूण सर्वस्‍व विसरून हा सोहळा पहातच रहावा’, असे मला वाटत होते.

इ. ‘कार्यक्रमाच्‍या अंती झालेला गुरुमहिमा ऐकतच रहावा’, असे मला वाटत होते.

३. सोहळा साजरा झाल्‍यावर काय जाणवले ?

अ. ‘तिन्‍ही गुरु डोळ्‍यांसमोरून जाऊच नयेत’, असे मला वाटत होते. नंतर मैदानातून ते स्‍थुलातून जरी गेले असले, तरी ‘सूक्ष्मातून त्‍यांनी त्‍या भव्‍य दिव्‍य रथासह माझ्‍या अंतरी प्रवेश केला आहे’, असा भाव माझ्‍याकडून ठेवला गेला.

आ. ज्‍या ज्‍या वेळी मी प्रार्थना किंवा गुरुस्‍मरण करण्‍यासाठी डोळे मिटायचे, त्‍या त्‍या वेळी मला माझ्‍या अंतरी रथात विराजमान श्रीविष्‍णुरूपातील सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ दिसायच्‍या.

इ. आता सोहळा झाल्‍यावरही ते मला दिसतात अन् ‘मला ऊर्जा देत आहेत’, असे मी अनुभवते.

४. वरील अनुभूती लिहीत असतांना आलेल्‍या अनुभूती

अ. वरील अनुभूती लिहीत असतांना मला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे अस्‍तित्‍व जाणवत होते. ‘तेच माझ्‍याकडून हे लिहून घेत आहेत’, असे मला वाटले.

आ. मी देवद आश्रमातील ध्‍यानमंदिराच्‍या जवळ बसून हे लिखाण करत असतांना ‘ध्‍यानमंदिराकडून श्‍वेत झब्‍बा परिधान केलेली कुणीतरी उंच व्‍यक्‍ती माझ्‍या दिशेने येत आहे’, असे मला जाणवले. तेव्‍हा ‘ती व्‍यक्‍ती अन्‍य कुणी नसून आपल्‍या सर्वांचे प.पू. गुरुदेवच आहेत’, असे वाटून मला आनंद झाला.

‘या ब्रह्मोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍या कृपेने मला या अनुभूती आल्‍या अन् त्‍यांनीच त्‍या लिहून घेतल्‍या’, त्‍याबद्दल त्‍यांच्‍याच चरणी हे अनुभूतीरूपी कृतज्ञतापुष्‍प समर्पणभावाने अर्पण करते.’

– वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्‍याणकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.५.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.