विद्याधिराज सभागृह, १९ जून (वार्ता.) – केरळ उच्च न्यायालयात वर्ष २००६ मध्ये धर्मांतरित हिंदूला अनुसूचित जातीच्या सुविधा देण्याविषयी एका याचिकेवर सुनावणी झाली. त्याची चर्चा अरुणाचल प्रदेशमधील आम्हा हिंदूंमध्येही झाली. यावरून तेथील वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. आम्ही तेथील धर्मांतराच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाय काढला आहे. जी हिंदु व्यक्ती अन्य धर्मांतील व्यक्तीशी विवाह करील, तिला तिच्या कुटुंबातील संपत्ती मिळणार नाही आणि तिची मुलेही तिला स्वतःलाच सांभाळावी लागतील. अरुणाचल प्रदेशमधील आम्ही हिंदू संघटित आहोत. त्यामुळे तेथील समस्येची काळजी करण्याची आवश्यकता नाही. पुढील ५ वर्षांत अरुणाचल प्रदेशमधील ख्रिस्ती धर्मांतराची समस्या संपवू, असे प्रतिपादन अरुणाचल प्रदेश बांबू संसाधन आणि विकास एजन्सीचे उपाध्यक्ष श्री. कुरु ताई यांनी केले.
श्री. कुरु ताई यांनी सांगितलेली अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे
१. अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येक कुटुंबातील १ तरी सदस्य धर्मांतरित आहे. एका सदस्यामुळे संपूर्ण हिंदू कुटुंब ख्रिस्ती बनते.
२. मध्यंतरी एका हिलिंग (उपचार) कार्यक्रमासाठी बिहारमधून २ पाद्री आणि अरुणाचल प्रदेशमधील १ पाद्री आले होते. त्यांनी असाध्य रोग बरे करण्याचा दावा केला. हे आम्हाला कळल्यावर आम्ही त्यांना तेथील आर्.के. मिशनच्या रुग्णालयातील कर्करोगाच्या रुग्णांना बरे करण्याचे प्रसारमाध्यमांसमोर आव्हान दिले. तेव्हा त्या पाद्य्रांनी नकार दिला. अशा प्रकारे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्या तेथील ख्रिस्त्यांचे षड्यंत्र आम्ही उघड करत आहोत.
श्री. कुरु ताई यांची धर्मकार्याची तळमळ !
श्री. कुरु ताई यांच्या धर्मकार्याची तळमळीविषयी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेली सूत्रे
१. श्री. कुरु ताई हे अरुणाचल प्रदेशमधील अत्यंत दुर्गम प्रदेशातील डोंगराळ भागात रहातात. तेथे जाणे-येणे अत्यंत कठीण आहे. अशा परिस्थितीत श्री. ताई हे तेथील २६ हिंदु जमातींना संघटित करून हिंदूंचे धर्मांतर रोखण्याचे कार्य करत आहेत. अशा प्रकारचे काम तेथे करणे अत्यंत कठीण आहे. त्यांच्यात संघटन करण्याचा आणि इतरांविषयी प्रेमभाव हे गुण आहेत.
२. श्री. ताई यांच्यात राष्ट्र-धर्माच्या कार्याविषयी असलेल्या तळमळीमुळे अरुणाचल प्रदेश येथून ४ फ्लाईट बदलून ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी उपस्थित राहिले आहेत.
३. श्री. ताई यांची मूळ भाषा निराळी आहे. त्यांना हिंदी भाषेत बोलण्यात अडचण येते. तरीही हिंदुत्वाच्या कार्याप्रती असलेल्या तळमळीमुळे आणि महोत्सवात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांना कार्य कळण्यासाठी त्यांनी हिंदी भाषेतून भाषण केले.
४. अरुणाचल प्रदेशातील हिंदूंच्या समस्यांविषयी त्यांचा चांगला अभ्यास असून त्यावर त्यांनी चांगल्या उपाययोजना काढून त्यानुसार कृतीही करून तेथील हिंदूंच्या स्थितीविषयी चिंतामुक्त केले आहे.
५. श्री. कुरु ताई यांच्यात धर्मकार्याची तळमळ असून त्यांच्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अत्यंत भाव आणि धर्मनिष्ठा आहे.