पुणे येथील पोलीस चौकीत उपनिरीक्षकाला मारहाण !

महिलेसह दोघे अटकेत

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – किरकोळ वादातून कात्रज पोलीस चौकीतील उपनिरीक्षक नितीन जाधव यांना धक्‍काबुक्‍की केल्‍याप्रकरणी प्रीतम परदेशी आणि त्‍यांची आई सुजाता परदेशी यांना अटक करण्‍यात आली आहे. या प्रकरणी जाधव यांनी भारती विद्यापीठ पोलिसांमध्‍ये तक्रार प्रविष्‍ट केली आहे.

आरोपी प्रीतम याचे अक्षय माळवे यांच्‍याशी भांडण झाले होते. त्‍यानंतर प्रीतम आणि त्‍याची आई सुजाता पोलीस चौकीत आले. दोघांनी पोलीस चौकीत आरडाओरडा करण्‍यास चालू केले. तेव्‍हा जाधव यांनी ‘आरडाओरडा करू नका’, असे सांगितले. तेव्‍हा तुला माहीत आहे का ? मी कोण आहे. तुझी वर्दी उतरवतो, अशी धमकी आरोपी प्रीतमने जाधव यांना दिली. प्रीतमची आई सुजाता यांनी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना धमकी देऊन त्‍यांना धक्‍काबुक्‍की केली.

संपादकीय भूमिका :

पोलीस चौकीत येऊन पोलिसांना मारहाण केली जाते यावरून पोलिसांचा वचक किती अल्‍प झाला आहे ? हेच लक्षात येते. असे पोलीस कायदा आणि सुव्‍यवस्‍था कशी राखणार ?