१. कार्यक्रमस्थळी गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि वातावरणात झालेले पालट
अ. ‘गोव्यामध्ये मे मासात पुष्कळ उष्णता आणि दमट हवामान असते. त्याचा विचार करून ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमस्थळी मैदानात मंडप घातला होता. ‘मंडपात साधकांना कोणत्याही प्रकारे उष्णतेचा त्रास होऊ नये; म्हणून जणू वायुदेवताच साधकांना वारा घालत होती’, असे मला जाणवले. त्यामुळे मंडपातील वातावरण सुखद आणि आनंदी होते.
आ. ‘स्वर्गलोकात देवतांनी सर्वांसाठी बसायची व्यवस्था केली होती’, असे मला जाणवले.
इ. वरुणदेवाने कार्यक्रमस्थळी स्वर्गाप्रमाणे हवामान ठेवले होते. त्यामुळे पाऊस पडण्याची चिन्हे असूनही वातावरण चांगले होते.
ई. ‘ब्रह्मोत्सव भूतलावर साजरा होत नसून तो स्वर्गलोकात देवताच साजरा करत आहेत आणि साधकांच्या माध्यमातून देवता सूक्ष्मातून सेवा करत आहेत’, असे मला जाणवले.
२. ब्रह्मोत्सव पहातांना साधकांनी अनुभवलेली भावस्थिती आणि आनंद !
प्रत्येक साधक उत्कट भावस्थिती अनुभवत होता. कुणी तो भाव हृदयात साठवून ठेवत होते, तर कुणी तो डोळ्यांमधून अश्रूंना वाट करून देत व्यक्त करत होते. गुरुदेवांच्या स्मरणात साधक तल्लीन झाले होते. प्रत्येक साधक आनंदी होता.
३. ब्रह्मोत्सव पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अ. ‘परात्पर गुरु डॉक्टर विराजमान झालेला रथ सोनेरी रंगाने रंगवलेला नसून प्रत्यक्ष सोन्याचा आहे’, असे मला वाटत होते.
आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शेजारी एका बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि दुसर्या बाजूला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ बसल्या होत्या. त्या प्रत्यक्ष देवताच वाटत होत्या.
इ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या देहातून आठही दिशांना चैतन्याचे फवारे प्रक्षेपित होत होते. त्या चैतन्याच्या लहरी सर्व साधकांपर्यंत पोचत होत्या आणि हिंदु राष्ट्र आणण्यामध्ये अडथळा आणणार्या सर्व अनिष्ट शक्तींना दूर करत होत्या.
ई. ‘सबंध भूमंडल उजळून निघाले असून चैतन्याने भारित होत आहे’, असे मला जाणवले.
उ. या सोहळ्याला भगवान श्रीकृष्ण आणि प्रभु श्रीराम आशीर्वाद देणार्या रूपात उपस्थित होते.
ऊ. माझ्या मनात कोणताही विचार नव्हता. ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांशी एकरूप होत आहे’, असे मला जाणवले.
ए. ‘खरा आनंद काय असतो ?’, हे या सोहळ्यातून मला अनुभवता आले. त्यामुळे माझ्या डोळ्यांतून सतत भावाश्रू येऊनही मला त्यांची जाणीव नव्हती. अजूनही त्या प्रसंगाचा विचार मनात आला, तर ते चित्र माझ्या अंतर्मनात स्पष्ट उभे रहाते आणि मी अंतर्मनातून आनंदात डुंबून जातो.
ऐ. ‘या सोहळ्यात परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पाने हिंदु राष्ट्राची स्थापना झाली असून साधक त्या आनंदात आहेत’, असे या सोहळ्यातून जाणवत होते.
ओ. साधक डोळ्यांत प्राण आणून ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन कधी होईल ?’, याची वाट पहात होते. या निमित्ताने परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व साधकांना एकत्रित करून साधनेची नवी उभारी दिली.
औ. सोहळ्याच्या निमित्ताने ‘जे आधीपासूनच संस्थेत आहेत, ते भावाच्या पुढच्या स्थितीत गेले आणि जे भावाच्या स्थितीला होते, ते त्याच्याही पलीकडे जात आहेत’, असे माझ्या लक्षात आले. ‘गुरूंचा संकल्प’, हेच याचे कारण आहे’, असे मला वाटले.
‘असा सोहळा या भूतलावर यापूर्वी कधी झाला असेल’, असे मला वाटत नाही. परात्पर गुरु डॉक्टरांच्या दर्शनाने सर्व जण कृतकृत्य झाले. ‘ब्रह्मोत्सव सोहळ्याला साधकांना उपस्थित रहाण्याची संधी मिळाली’, याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. मधुसूदन कुलकर्णी (वय ६० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), फोंडा, गोवा. (१२.५.२०२३)
|