१. अधिवेशनाच्या सेवेला येणारे साधक घरी रहायला येणार असल्याचे समजल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांच्या रूपात येणार आहेत’, असा भाव ठेवणे
‘१२ ते १८.६.२०२२ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे ‘दशम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशन’ झाले. या वेळी मला ‘मी रुग्णाईत असल्याने ‘सेवा करू शकत नाही’, याची खंत वाटत होती. गुरुकृपेने अधिवेशनाच्या सेवेला येणार्या साधकांपैकी ५ साधक आमच्याकडे रहायला येणार असल्याचे मला समजले. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टरच साधकांच्या रूपात येणार आहेत आणि मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळत आहे’, असा भाव मी ठेवला.
२. १०.६.२०२२ या दिवशी आमच्याकडे अधिवेशनाच्या वेळी सेवा करणारे साधक रहायला आले. तेव्हा मला घरातील वातावरण चैतन्यमय वाटू लागले.
३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या वेष्टनावर मोरपीस आणि त्रिशूळ उमटल्याचे लक्षात येणे
११.६.२०२२ या दिवशी साधक अधिवेशनस्थानावरून घरी आले. तेव्हा त्यांनी माझ्याकडे असलेला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पाहिला. त्या वेळी त्यांनी मला ‘या ग्रंथाच्या वेष्टनावर मोरपीस आणि त्रिशूळ उमटला आहे’, हे दाखवले.
४. प.पू. दास महाराज यांनी ग्रंथावर मोरपीस आणि त्रिशुळ यांसह अमरनाथ येथील शिवलिंगही दिसत असल्याचे सांगणे
ग्रंथाच्या वेष्टनावर मोरपीस आणि त्रिशूळ उमटल्याचेे मी प.पू. दास महाराज यांना सांगितले. त्यानंतर १ – २ दिवसांनी मी प.पू. दास महाराज यांना ते वेष्टन नेऊन दाखवले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘ग्रंथाच्या वेष्टनावर मोरपीस आणि त्रिशुळ यांसह अमरनाथ येथील शिवलिंगही दिसत आहे.’’ तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टर आणि प.पू. दास महाराज यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
५. मारुतिरायाने माकडाच्या रूपात दर्शन देणे
१३.६.२०२२ या दिवशी एक माकड आमच्या सदनिकेतील खिडकीच्या गजांना धरून आत बघू लागले आणि काही वेळानंतर ते निघून गेले. माझ्या मुलीने या माकडाचे चित्रीकरण केले होते. ते प.पू. दास महाराज यांना दाखवल्यावर ते म्हणाले ‘‘तुमची धाकटी मुलगी (कु. सुरभि) आणि तिची आई यांना दर्शन देण्यासाठी मारुतिराया आले होते.’’ त्यांचे बोलणे शिरसावंद्य मानून मी मारुतिरायाला मनोमन साष्टांग दंडवत घातला आणि प.पू. दास महाराज यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन केले.’
– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, रायंगिणी, बांदोडा, गोवा (१६.६.२०२०)
|