पालखी प्रस्‍थानानंतर देहूमध्‍ये स्‍वच्‍छता कर्मचार्‍यांनी केली त्‍वरित स्‍वच्‍छता !

१४ टन ओला कचरा, तर ६५० किलो प्‍लास्‍टिक कचरा जमा केला !

स्वच्छता करताना पालिकेचे स्वच्छता कर्मचारी

देहू (पुणे) – संत तुकाराम महाराज यांच्‍या पालखीचे प्रस्‍थान ११ जून या दिवशी येथून झाल्‍यानंतर गावातील कचर्‍याची त्‍वरित स्‍वच्‍छता करण्‍यात आली. या वेळी १४ टन ओला कचरा, तर ६५० किलो प्‍लास्‍टिक कचरा जमा करण्‍यात आला. पालखी मुक्‍काम आणि रस्‍त्‍याच्‍या बाजूला पडलेला कचरा, तसेच परिसरातील स्‍वच्‍छता करून गाव स्‍वच्‍छ सुंदर आणि निर्मल ठेवण्‍यात येणार आहे. यासाठी पुणे जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग यांवर प्रत्‍येकी २०० कचराकुंड्या ठेवण्‍यात आल्‍या आहेत.

पालखी सोहळा पुढे गेल्‍यानंतर स्‍वच्‍छता करण्‍यासाठी २५० स्‍वच्‍छता कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. पालखी मुक्‍काम, विसावा, निवारा आणि रस्‍त्‍याच्‍या कडेलाही स्‍वच्‍छतेसाठी कचराकुंडीची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. पालखी मुक्‍कामाच्‍या एक दिवस आधी कचराकुंडी उभारण्‍यात येणार असून पालखी प्रस्‍थान झाल्‍यानंतर तात्‍काळ परिसरातील झाडलोट करून घनकचरा प्रकल्‍प केंद्राच्‍या ठिकाणी प्रक्रियेसाठी दिला जाणार आहे.