गोवा : कोकण रेल्वे महिला पोलिसांनी रेल्वेस्थानकावर सापडलेली बॅग केरळच्या विद्यार्थिनीला केली परत !

दोन्ही महिला पोलिसांचे  प्रामाणिकपणाबद्दल होत आहे कौतुक !

हेरिदिया के.एस्. यांना बॅग परत करतांना महिला पोलीस नीता कवळेकर आणि आश्विता नाईक

मडगाव, ८ जून (वार्ता.) – कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर सापडलेली ४० सहस्र रुपयांचा ऐवज असलेली बॅग २ महिला पोलिसांनी प्रामाणिकपणे केरळ येथील वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीला परत केली. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

केरळ येथील वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी हेरिदिया के.एस्. ही महाविद्यालयीन सहलीसाठी गोव्यात आली होती. मडगाव रेल्वेस्थानकावर ती तिची बॅग विसरली. स्थानकावरील गोवा पोलीस विभागातील नीता कवळेकर आणि आश्विता नाईक या दोघांना सेवेत असतांना ही बॅग सापडली. या बॅगेत एक कॅमेरा आणि इतर साहित्य मिळून ४० सहस्र रुपयांचा ऐवज होता. त्यांनी ही बॅग पोलीस ठाण्यात नेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बॅगेच्या मालकाचा शोध घेणे चालू केले. शेवटी हेरिदिया के.एस्. यांची ही बॅग असल्याचे लक्षात येताच पूर्ण माहिती घेऊन आणि ओळख पटवून तिला परत करण्यात आली. हेरिदिया के.एस्. यांनी दोन्ही महिला पोलिसांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले, तसेच रेल्वेस्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांचेही आभार मानले.