सातारा येथील राजवाडा बसस्‍थानक परिसरातील शिवशिल्‍प उद़्‍घाटनासाठी शिवशिल्‍प समितीची अनुमती आवश्‍यक !

कापडाने झाकून ठेवलेली शिवशिल्‍प

सातारा, ७ जून (वार्ता.) – येथील माजी नगरसेवक श्री. विजयकुमार काटवटे यांच्‍या प्रयत्नातून राजवाडा बसस्‍थानक परिसरात प्रशासनाच्‍या वतीने शिवराज्‍याभिषेक शिल्‍प साकारण्‍यात आले आहे. यामध्‍ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्‍ट्रसंत श्रीसमर्थ रामदासस्‍वामी यांचेही एक शिल्‍प निर्माण करण्‍यात आले आहे; मात्र या शिल्‍पाला शहरातील काही संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्‍यामुळे हे शिवराज्‍याभिषेक शिल्‍प आणि त्‍यासह इतर शिल्‍पे कापडाने झाकून ठेवण्‍यात आली आहेत. आता या शिवशिल्‍पासाठी एक समिती गठीत करण्‍यात आली असून त्‍या समितीच्‍या अनुमतीनेच हे शिवशिल्‍प शिवभक्‍तांसाठी खुले करण्‍यात येणार असल्‍याचे समजते.

याविषयी माजी नगरसेवक विजयकुमार काटवटे यांना ६ जून या दिवशी शाहूपुरी पोलीस ठाण्‍याकडून सीआर्‌पीसी कलम १४९ अन्‍वये नोटीस देण्‍यात आली. नोटिसीचा आशय असा आहे की, प्रसारमाध्‍यमे आणि जनमानसातून मिळत असलेल्‍या माहितीनुसार ६ जून यादिवशी शिवराज्‍याभिषेकदिनाचे औचित्‍य साधून गनिमी काव्‍याने राजवाडा येथील शिवशिल्‍पाचे उद़्‍घाटन केले जाणार आहे. यासाठी आपण (नगरसेवक काटवटे) आणि आपले सहकारी प्रयत्न करत आहात; मात्र यासाठी शिवशिल्‍प समिती गठीत करण्‍यात आली असून त्‍यांच्‍या अनुमतीने उद़्‍घाटन करू शकता, हे तुम्‍हाला माहिती आहे. या प्रकरणी जर कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण झाला, तर आपल्‍यास उत्तरदायी धरून प्रचलीत कायद्यान्‍वये आपणावर कारवाई करण्‍यात येईल.